पुणतांब्यात कृषी कन्यांचे अन्नत्याग आंदोलन मोडून काढले

पुणतांब्यात कृषी कन्यांचे अन्नत्याग आंदोलन मोडून काढले

नगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी पुणतांबा (ता. राहाता) येथे शेतकऱ्यांच्या मुलींनी सहा दिवसांपूर्वी सुरु केलेले "अन्नत्याग' आंदोलन शासनाने आज (शनिवारी) पहाटे अक्षरशः मोडून काढले. उपचाराला नकार देणाऱ्या तरुणींना जबरदस्तीने उपचारासाठी नगरला हलवले असून आंदोलनासाठी उभारलेला मंडपही काढून घेतला.

पुणतांब्यात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध करत आज दुपारपर्यंत गाव बंद ठेवून निषेध सभा घेतली.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्यावर्षी देशभर गाजलेल्या शेतकरी संपाची सुरवात पुणतांबा येथून झाली होती. त्यानंतर सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झाली नाही.

त्यामुळे गेल्या 4 फेब्रुवारीपासून पुणतांबा येथे निकिता धनंजय जाधव, पूनम राजेंद्र जाधव, शुभांगी संजय जाधव या शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले.

पहिले चार दिवस प्रशासनाने आंदोलनाची अजिबात दखल घेतली नाही. चौथ्या दिवशी पालकमंत्री राम शिंदे यांनी उपोषणकर्त्या तरुणींची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती. मात्र त्यांचेही प्रयत्न असफल झाले. चौथ्या दिवशी शुभांगी जाधव हिची प्रकृती खालावली. मात्र अन्य उपोषणकर्त्या तरुणींसह गावकऱ्यांनी विरोध केल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले नव्हते.

मात्र शुक्रवारी गावकऱ्यांचा विरोध मोडून शुभांगीला उपचारासाठी नगर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत भेट देऊन माहिती घेणार असल्याची चर्चा होती. मात्र ते आले नाहीत.

मात्र आज शनिवारी पहाटे पोलिसांनी निकिता धनंजय जाधव, पूनम राजेंद्र जाधव यांना बळजबरीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या ठिकाणचा मंडपही सबंधित मंडप मालकाला काढून घ्यायला लावत हे आंदोलन मोडून काढले. पुणतांबा गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला असून आज शनिवारी दुपारपर्यंत गाव बंद ठेवले व सरकारच्या भूमिकाचा निषेध करत निषेध सभा घेतला.

दरम्यान गावांतील काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Administration forced farmers daughters to end hunger strike in Puntamba

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com