अजित पवारांच्या निरोपानंतर सुभाष देसाई औरंगाबादकडे धावले

सरकारनामा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही चांगलेच कामाला लावल्याचे समजते. वित्त मंत्री या नात्याने त्यांनी सरकारमधील सर्वच मंत्रयांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी असलेल्या जिल्हयांची नियोजन समितीच्या बैठका घेवून त्याचा अहवाल काल उशीरापर्यंत पाठविण्याचे आदेश दिले होते

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाक्‍यात कामाला सुरूवात केली असून त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्रयांची धावपळ उडाली. त्यांच्या या कामाचा दणका शिवसेनेच्या मंत्र्यांनाही बसला असून औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी औरंगाबादला तातडीने रवाना झाले आहेत.

अजित पवार यांच्या कामाची पद्धत सर्वांना सर्वश्रुत आहे. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर गेल्या आठवडण्यात ते सकाळी सात वाजताच पुण्यात दाखल झाले. त्यामुळे अधिका-यांची भल्या सकाळी चांगलीच धावपळ झाली. पवार यांनी दादरच्या इंदू मिलमध्ये आकारास येणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी भेट घेवून स्मारकाच्या नियोजन आराखडयात अनेक बदल सुचविले. वित्तमंत्री म्हणून देखिल त्यांनी विभागाच्या बैठकांच्या आढावा बैठकांचा धडाका सुरू झाला असून वित्त विभागाचे अधिकारी सकाळी सात वाजताच बैठकांच्या शक्‍यतेमुळे तयारीत राहत असल्याचे सांगण्यात आले. 

अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही चांगलेच कामाला लावल्याचे समजते. वित्त मंत्री या नात्याने त्यांनी सरकारमधील सर्वच मंत्र्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी असलेल्या जिल्हयांची नियोजन समितीच्या बैठका घेवून त्याचा अहवाल काल उशीरापर्यंत पाठविण्याचे आदेश दिले होते.

उद्योगमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद जिल्हयांचे पालकमंत्री आहेत. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व पालकमंत्री आपल्या जिल्हयात ध्वजारोहण करणार आहे. त्यापूर्वी 25 जानेवारी रोजी औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीचा बैठक घेवून अहवाल देतो, असा निरोप देसाई यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला. ही बाब अजित पवार यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी अर्थसंकल्पात औरंगाबादसाठी निधी मिळाला नाही तर चालेल का, असा सवाल करून हा निरोप देसाई यांना देण्याचे आदेश कार्यालयातील अधिका-यांना दिले. या निरोपामुळे देसाई आजच तातडीने औरंगाबादला रवाना झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अजित पवार यांनी या कामासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना काही अंशी सूट दिली आहे. शिंदे ठाणे आणि गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे गडचिरोलीचा अहवाल उद्या 21 जानेवारीच्या सायंकाळपर्यंत दिला तरी चालेल, अशी सूट शिंदे यांना मिळाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ठाणे नियोजन समितीची आज बैठक संपवली असून उद्या ते गडचिरोलीला रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.

WebTittle :: After Ajit Pawar's departure, Subhash Desai rushed to Aurangabad


संबंधित बातम्या

Saam TV Live