राळेगणसिद्धीत सफरचंदाची बाग, पंधराच गुंठ्यात १० लाख!

राळेगण सिद्धीत फुललेली सफरचंदाची बाग.
राळेगण सिद्धीत फुललेली सफरचंदाची बाग.

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी : सफरचंद म्हटलं की पटकन कोणाच्याही डोळ्यासमोर उभं राहतं ते काश्मीर. थंड आणि बर्फाळ प्रदेशात येणार फळं. मात्र, हे विसरायला लावणारी सफरचंदाची यशस्वी लागवड करण्याची किमया आदर्श गाव राळेगणसिद्धी येथील प्रयोगशील शेतकरी राजेंद्र हरिश्चंद्र पठारे यांनी करून दाखवली आहे. दोन वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेश येथून १०० झाडे आणून लागवड केलेल्या हरमन-९९ या जातीच्या सफरचंदाच्या झाडाला सध्या चांगलीच फळे लगडली आहेत.

पठारे हे सुरुवातीपासूनच शेतीत नवनवे प्रयोग करत असतात. त्यांना जवळपास ३५ एकर शेतजमीन आहे. सुरुवातीला त्यांनी डाळिंबाची लागवड केली होती. डाळिंबानेही त्यांना भरभराटही दिली. मात्र, सततच्या तेल्या रोगाने त्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नव्हते. मात्र खचून न जाता त्यांनी डाळिंबाला पर्याय म्हणून वेगवेगळ्या पिकांचा अभ्यास करायला सुरुवात केली. (Apple cultivation at Adarsh Gaon Ralegan Siddhi)

राळेगण सिद्धीत फुललेली सफरचंदाची बाग.
मी नारायण तातू राणे.. नारायण राणेंनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ

यू ट्यूबवरून घेतली माहिती

यावेळी पठारे म्हणाले की, मला सोशल मीडियाची मोठी मदत झाली. युट्युबवर शेती विषयक अभ्यास करत असताना राजस्थान येथील शेतकऱ्याने सफरचंदाची यशस्वी लागवड केल्याचे पाहिले. त्यावेळी असं लक्षात आलं की राजस्थानमध्ये हे शक्य आहे, तर माझ्या शेतात का नाही? त्यानंतर सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला. त्या पिकाची सोशल मीडियाची मदत घेत अभ्यास केला. अभ्यासानंतर साधारणतः ४० ते ४५ डिग्री तापमानात येणाऱ्या हरमन-९९ जातीच्या रोपांची निवड केली. त्यासाठी कुठलीच वेगळी खते किंवा मशागत केली नाही.

पंधरा गुंठ्यात प्रयोग म्हणून १०० रोपांची लागवड केली. सफरचंदाची फळधारणा झाली आहे. फळांना चांगला रंग आणि चव आहे. पुढच्या बाराला मोठ्या प्रमाणावर सफरचंदाचे उत्पन्न येण्याची त्यांना आशा आहे. विशेष म्हणजे डाळिंबाच्या तुलनेत या पिकाला पाणी, श्रम आणि खर्च कमी लागत असल्याचा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, सरपंच डॉ. धनंजय पोटे, माजी सरपंच लाभेष औटी, जयसिंग मापारी, मंगल मापारी, उद्योजक सुरेश पठारे, दादा लक्ष्मण पठारे, दादा महादू पठारे, रमेश औटी, विलास औटी, जालिंदर मापारी, प्राचार्य दिलीप देशमुख, पर्यवेक्षक भाऊसाहेब धावडे, संगिता पठारे, शरद मापारी, सुनील हजारे, विजय पोटे, स्वप्निल गाजरे, दादाराम पठारे, आकाश पठारे आदींसह ग्रामस्थांकडून या नाविन्यपूर्ण प्रयोगाचे कौतुक होत आहे. पठारे यांच्या अनुभवाचा फायदा घेत अन्य शेतकरीही परिसरात सफरचंदाची लागवड करतील, अशी अशा येथील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

राळेगण सिद्धीत फुललेली सफरचंदाची बाग.
13 वकील, सहा डॉक्टर, पाच अभियंते; असे असेल मोदींचे मंत्रिमंडळ

पंधरा गुंठ्यात दहा लाख अपेक्षित

काश्मीरचे सफरचंद दिवाळीच्या दरम्यान बाजारात विक्रीस येतात. आपल्या भागातील सफरचंद जून-जुलैपासूनच बाजारात येते. त्यामुळे दर चांगला मिळतो. ठोक बाजारात शंभर रूपये ते सव्वाशे रूपये विकले जाते. पठारे यांच्याकडे पंधरा गुंठ्यात १०० झाडे आहेत. एका झाडापासून साधारणपणे १० ते १५ हजार रूपये मिळू शकतात. कारण एका झाडाला आताच किमान पावणेदोनशे फळधारणा झाली आहे. या गणितानुसार अर्धा एकरात १० लाखांचे उत्पन्न मिळू शकते, असा विश्वास पठारे यांनी व्यक्त केला. पठारे यांना आतापर्यंत ३० हजार रूपये खर्च आला आहे. आणि त्यातील आंतरपिकांतून २० हजार रूपये मिळाले आहेत.

सफरचंदानंतर खजूरचीही लागवड

डाळिंबाच्या शेतीला मोठा खर्च औषध फवारणीसाठी होतो. मात्र, सफरचंदाच्या शेतीला कमी खर्च लागत असल्याने तसेच डाळिंबापेक्षा कमी श्रम आणि पाणी या पिकाला लागत असल्याने आणखी एक एकर क्षेत्रात सफरचंदाच्या रोपांची तसेच खजुराच्या झाडांची लागवड करणार आहे. योग्य व्यवस्थापन आणि नियोजन केल्याने आज १०० पैकी १०० झाडे जगली आहेत. कांदा, कांद्याचे रोपे, मिरची, टोमॅटो, भेंडी, वांगे, कोथिंबीर, गवार, फ्लॉवर, कोबी, मेथी अशी आंतरपीके घेत मागील दोन वर्षात उत्पन्नही मिळाले आहे.

- राजेंद्र पठारे, प्रयोगशील शेतकरी, राळेगणसिद्धी

भारताच्या भूमीतील स्वर्ग अशी ओळख असलेल्या जम्मू - काश्मीरमध्ये पिकणारे टवटवीत सफरचंद आपल्या सर्वांच्याच आवडीचे आहे. तेच स्वर्गातले फळ आता आमच्या गावातही पिकू लागलं आहे. विश्वास बसत नसेल तर एकदा आवर्जून भेट द्या. कारण हे खरं आहे. डाळिंब, सीताफळ, पेरू, आंबा, मोसंबी, संत्री, पपई याबरोबरच आता सफरचंदाचीही बाग फुललेली आहे. लवकरच आपल्याला गोड व मधाळ सफरचंद खायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. (Apple cultivation at Adarsh Gaon Ralegan Siddhi)

- लाभेष औटी, माजी सरपंच राळेगणसिद्धी

प्रतिकूल वातावरणात राजेंद्र पठारे यांनी सफरचंदाची फुलविलेली बाग इतर तरूण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. असे नाविन्यपूर्ण प्रयोग तरुणांनी शेतीत केले तर चांगले उत्पन्न मिळेल आणि शहरांकडे नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणांचा लोंढा थांबेल. असे झाले तर खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचे खेड्याकडे चला हे स्वप्न साकार होईल.

- ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, राळेगणसिद्धी

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com