अतिवृष्टीग्रस्त बीड जिल्ह्यातील शेतकरी, वीज वितरण कंपनीमुळे पुन्हा हतबल!

मुख्यमंत्री साहेब मेहरबानी करून लाईट व्यवस्थित करा, 2 दिवसात शेतातील सगळे पिक करपून जाईल - शेतकऱ्यांची आर्त हाक
महावितरण
महावितरण SaamTvNews

बीड : विद्युत वितरण कंपनीच्या (MSEB) आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांकडून, आता सक्तीची वीजबिल वसुली केली जात असल्याने, शेतकऱ्यांमधून (Farmers) संताप व्यक्त केला जात आहे. बीडच्या नाळवंडी गावातील वीज 15 दिवसापासून कट केलीय. त्यामुळे कापूस, ज्वारी, गहू, हरभरा कांदा, भाजीपाला, जळून चालला आहे. एकीकडे सिंचनासाठी मिळणारे वीज वेळेवर पुरेशी मिळत नाही.

वीज बिल अव्वाचे सव्वा आकारले जात असतांना, त्याची वसुली सक्तीने केली जात आहे. जशी सक्तीने वसुली तशी सक्तीने सेवा द्यावी. अगोदर वीज वितरण कंपनीने गलथान कारभार कमी करावा, नंतर आम्ही स्वतः वीज बिल भरू, असा सूर शेतकऱ्यांमधून निघत आहे.

हे देखील पहा :

बीड शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या, नाळवंडी गावची सिंचनासाठीची वीज 15 दिवसापासून कट केली. त्यामुळे माझं लाख-दीड लाख रुपयाचं नुकसान झालं आहे. कांदा आहे, आंबा, सीताफळ, फळबागा आहेत. त्यांना पाणी असतांना देखील पाणी देण्यासाठी लाईट नसल्यामुळे पाणी देता येत नाही. कांदा तर अक्षरशा जळून चाललाय, केलेला खर्च देखील निघणार नाही. अनुदान 2 हजार मिळाल. लाईट बिल 7 हजार रुपये भरा म्हणत आहेत. जर दोन दिवसात लाईट नाही आली तर सगळं जळून जाईल. अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. काय करावं? असा उद्विग्न सवाल गणेश काळे या तरुण शेतकऱ्याने केला आहे.

कुंडलिक वाघमारे यांनी तर वीज वितरण कंपनीच्या संदर्भात अक्षरशा बुरखा फाडलाय. तार तुटली तर आम्ही स्वतःहून वर्गणी करून पैसे जमा करतो आणि खाजगी व्यक्तीकडे पैसे देऊन दुरुस्तीचे काम करून घेतो. त्यावेळी विद्युत वितरण अधिकाऱ्याला सांगून देखील काम होत नाही. आणि आता ऐन हंगामातच विज बिल सक्ती केली असून वीज कट केली आहे. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. असं कुंडलिक वाघमारे यांनी सांगितलं

महावितरण
Big News | धुतलेले कपडे नसल्याने गर्भवतीला रुग्णालयातून परत पाठवले! पहा Video
महावितरण
औरंगाबादमध्ये स्क्वॅश खेळाच्या कोचला पळवून-पळवून चपलेने मारहाण! पहा Video

8 ते 15 दिवस झाले लाईट बंद केलीय. माझ्या शेतात भाजीपाला आहे. पंधरा दिवसापासून पाणी न दिल्यामुळे भाजीपाला सुकून चालला आहे. अनुदान 3 हजार रुपये आलंय. मात्र ते देखील अद्याप खात्यावर आलेली नाही, विज बिल 7 हजार रुपये आले आहे. ते कसे भरावे ? अतिवृष्टीने शेतात सगळंच गेलं होतं. आता पैसे येणार तरी कुठून ? मुख्यमंत्री साहेबांनी मेहरबानी करून आमची लाईट व्यवस्थित करा. अशी मागणी शेतकरी बंडू मेहेत्रे यांनी केलीय.

नाळवंडी गावात सर्व शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे शेतातील उभे पीक पाणी असताना जळून जात आहे. विहिरीमध्ये नदीला पाणी असून देखील वीज वितरण कंपनीने लाईट कट केल्यामुळे, पिकाला पाणी देता येत नाही. ऊर्जामंत्री यांनी शेतकऱ्यांना अगोदर पुरेशा दाबाची दहाच तासाची दिवसा वीज द्यावी. तसेच हंगामामध्ये वीज पंपासाठी वीज वापरली जात असताना, शेतकऱ्यांना वर्षभराचे वीज बिल आकारले जाऊ नये. वेळेवर मीटर सुविधा मिळत नाहीत, विद्युत तारा आणि रोहित्र जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अगोदर वीज वितरण कंपनीने गलथान कारभार कमी करावा. नंतर आम्ही स्वतः वीज बिल भरू असं धनंजय गुंदेकर म्हणाले.

महावितरण
धक्कादायक : मुंबईत तरुणीवर बलात्कार करुन हत्या; टेरेसवर फेकला मृतदेह! पाहा Video

विद्युत वितरणच्या गलथान कारभारासंदर्भात, अधीक्षक अभियंता कोलपे यांना विचारले असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. तसेच वीज बिल वसुली संदर्भात आम्हाला सूचना दिल्या आहेत, म्हणून आम्ही ही मोहीम राबवत आहोत असं फोनवरून सांगितले.

दरम्यान, थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी नाळवंडीतचं नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यात वीज वितरण विभाग सक्तीने वीज बिल वसुली करत आहे. या विरोधात शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अगोदरच अतिवृष्टीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता विज बिल भराव कसं? हा प्रश्न समोर आहे. पैसे नाही तर आत्महत्या करावी का ? असा सवाल देखील शेतकरी उपस्थित करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com