विदर्भात वादळी पावसाची शक्यता

विदर्भात वादळी पावसाची शक्यता

पुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ, मराठवाड्यात उद्या (ता. २९) पावसाचा अंदाज आहे. पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम झाल्याने बुलडाणा, अमरावतीमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. अकोला, वाशीम, यवतमाळमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस; तर वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यासह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  

राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच असल्याने दिवस रात्रीच्या तापमानात तफावत वाढली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कमाल व किमान तापमानात घट झाली आहे, तर कोकण आणि विदर्भात मात्र तापमानात थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले. गुरुवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सलग दुसऱ्या दिवशी नीचांकी ७.५ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३८.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह आल्याने दोन दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानात अचानक घट होत गारठा थोडासा वाढला आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी ३५ अंशांच्या वर गेलेला कमाल तापमानाचा पारा पुन्हा खाली आला आहे. कोकणात मात्र उन्हाचा ताप कायम असून, रत्नागिरीसह सांताक्रूझ, अलिबाग, तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूरमध्ये तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे होते.

गुरुवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल व किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.८ (१२.१), नगर ३३.५ (१२.१), धुळे ३२.० (१०.४), जळगाव ३२.६ (१३.०), कोल्हापूर ३२.८ (१९.६), महाबळेश्‍वर २७.९ (१५.१), मालेगाव ३१.८ (१३.०), नाशिक ३०.२ (१२.०), निफाड २८.५ (७.५), सांगली ३५.० (१८.४), सातारा ३२.५ (१४.५), सोलापूर ३५.१ (१९.७), अलिबाग ३५.९ (१९.४), डहाणू ३४.४ (१९.०), सांताक्रूझ ३६.४ (२०.४), रत्नागिरी ३८.० (१९.७), औरंगाबाद ३१.० (१३.५), परभणी ३२.८ (१२.८), नांदेड ३३.० (१६.०), अकोला ३३.४ (१४.२), अमरावती ३१.८ (१३.०), बुलडाणा ३०.० (१६.०), चंद्रपूर ३२.५ (१४.०), गोंदिया २८.५ (१४.६), नागपूर ३१.६ (१२.५), वर्धा ३२.० (१५.४), यवतमाळ ३०.५ (१७.४).

​Web Title heavy rain prediction in vidarbha

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com