पपई उत्पादक शेतकरी अडचणीत; अतिवृष्‍टी, वातावरण बदलाने रोग

पपई उत्पादक शेतकरी अडचणीत; अतिवृष्‍टी, वातावरण बदलाने रोग
पपई
पपई

शहादा (नंदुरबार) : अतिवृष्टी व वातावरणातील बदलाचा सर्वांत मोठा फटका पपई उत्पादकांना बसला असून, ऐन फळधारणेत डावणीसह विविध विषाणूजन्य रोगाच्या प्रादूर्भाव झाल्याने शेकडो एकर क्षेत्रावरील पपई वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पिकासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च रोगामुळे वाया जाणार आहे. यामुळे शेतकरी पुरता धास्तावला आहे. बाजारात मिळणाऱ्या महागड्या औषधांची फवारणी करूनही या आजारांचा अटकाव होत नसल्याने शेतकरी पुरता जेरीस आला आहे. (nandurbar-news-shahada-taluka-Papaya-growers-in-trouble-Excessive-rainfall-climate-change-diseases)

शहादा तालुक्यात सर्वाधिक चार हजारांहून अधिक हेक्टरवर पपईची लागवड झाली आहे. पपई उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च लागतो. लागवडीवेळी उन्हाच्या तीव्रतेने मर रोगाचा प्रादूर्भाव झाला होता त्यामुळे तीन ते चार वेळा रोपे आणून पुन्हा लागवड करावी लागली. अनेक विषाणूजन्य रोगांचा प्रादूर्भाव झाल्याने सहाजिकच खर्चाचे प्रमाण वाढले. जून, जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटली. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश क्षेत्रात पीक खराब झाले. दरवर्षी पपईचे दर कमी अधिक होत असल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ सोसावी लागते. लागवडीपासून ते काढणीपर्यंत होणाऱ्या लाखोंच्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

पाने होताहेत पिवळे व कोरडे

सध्या पपईच्या झाडाला फळे लगडली आहेत. त्यातच डावनीचा प्रादूर्भाव झाल्याने पपईच्या झाडाची पाने पिवळे पडणे, झाडांची छत्री बारीक होणे, कोरडी पडणे आदी प्रकार होत आहेत. पपई पीक मुख्यत: पानांच्या छत्रीवर अवलंबून असते. शेंड्यावरची पानांची छत्री गेल्यावर झाडच कमकुवत होते. त्यामुळे उन्हाळ्यात सावली नसल्याने फळांवर चटके बसतात व खराब होऊन आर्थिक नुकसान होते. व्यापारी माल घेत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. सध्या मोठ्या प्रमाणावर ऊन पडत आहे. त्यातच झाडांची पानगळ झाल्याने झाड रिते होत आहे. परिणामी, सूर्याची किरणे फळांवर येत असल्याने फळे खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पपई
दसऱ्याच्‍या दिवशीच घराची राख; पहाटे सिलेंडरचा स्‍फोटने उध्‍वस्‍त

भरपाईची अपेक्षा..

पपईची रोपे व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेऊन शेतकऱ्यांनी पपईची लागवड केली आहे. बँकेकडून कर्ज, उधार, उसनवारी पैसे घेऊन उत्पादन येईल, या आशेवर पपईच्या खर्च भागवला. मात्र, ऐन फळधारणेच्या वेळेस हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com