राज्यपालांच्या 'त्या' पत्रावर अमित शाहांनाही नाराजी, अमित शहा काय म्हटले वाचा सविस्तर...

सरकारनामा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे सुरु करण्याबाबत पाठविलेल्या पत्रावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्यावर नाराज झाले आहेत.

राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले होते. त्यावरुन राज्यात चांगलाच वाद पेटला. ज्या दिवशी भाजप मंदिरे सुरु करण्याबाबत राज्यव्यापी घंटानाद करणार होते, त्याच दिवशी राज्यपालांनी हे पत्र पाठवले होते. मुख्यमंत्री आपले हिंदुत्व विसरले आहेत काय, असा सवाल राज्यपालांनी केला होता. आजवर नावडता असलेला 'सेक्युलर' शब्द मुख्यमंत्र्यांना आवडायला लागला का, अशी खोचक विचारणाही त्यांनी या पत्रात केली होती. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे या पत्रावरुन राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा झाली. मात्र, भाजपच्या नेत्यांनी याबाबत मौन बाळगले होते. दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे सुरु करण्याबाबत पाठविलेल्या पत्रावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्यावर नाराज झाले आहेत. कोश्यारी यांनी लिहिलेले पत्र मी वाचले असून या पत्रातले काही शब्द त्यांना टाळता आले असते, असे शहा म्हटले आहे.

पाहा, पत्रावरुन कसा रंगला वाद आणि नेमकं पत्रांमध्ये होतं काय?

या पत्राला मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले होते. तुमच्याकडून हिंदुत्व शिकण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही, असे ठाकरे यांनी राज्यपालांना सुनावले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून याबाबत नाराजी व्यक्त केली होती. धार्मिक स्थळे उघडली नाहीत म्हणून तुम्ही कुणाची 'सेक्युलर' अशी अवहेलना करणार का, अशी विचारणा त्यांनी या पत्रातून केली होती.  तसेच राज्यपालांचे वागणे राज्यघटनेच्या चौकटीबाहेरचे आहे. या पत्रातील भाषा पाहून तुम्हाला माझ्या म्हणण्याची खात्री पटेल याची मला खात्री आहे. सेक्युलर हा शब्द संवैधानिक आहे. मात्र, दुर्देवाने राज्यपालांनी लिहिलेलं हे पत्रं एखाद्या राजकीय नेत्याच्या भूमिकेत असल्यासारखे लिहिले आहे. घटनात्मक मूल्यांचा आदर राखला गेलाच पाहिजे या हेतूने मी तुमच्याशी आणि जनतेशी या पत्राद्वारे संवाद साधत आहे, असे शरद पवार यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात  म्हटले होते.

आता भाजपचे अत्यंत पाॅवरफूल नेते, माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि आताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच राज्यपालांच्या भूमीकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकार व राज्यपाल यांच्यात वाद होण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. महाविद्यालयांच्या परिक्षा घेण्यावरूनही या आधी सरकार व राज्यपाल यांच्या तू तू -मैं मैं झाली आहे. आता मंदिर प्रकरणातील पत्रावरुन अमित शहांच्या नाराजीनंतर राज्यातले भाजप नेते याबाबत काय भूमीका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live