आता मसूद आणि त्याच्या संघटनांना खिळखिळं करण्याची पाकिस्तानसमोर कसोटी

आता मसूद आणि त्याच्या संघटनांना खिळखिळं करण्याची पाकिस्तानसमोर कसोटी

दहशतवादाला आपला देश थारा देत नसल्याचा आव पाकिस्तान आणतो. ते सिद्ध करण्याची जबाबदारी आता त्या देशाची आहे. मसूद व त्याच्या संघटना यांना खिळखिळे करण्यात पाकिस्तानची कसोटी लागणार आहे.

पाकिस्तानस्थित जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरला अखेर सुरक्षा समितीने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. २००१ मध्येच राष्ट्रसंघाने ‘जैश’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. या संघटनेला ओसामा बिन लादेनची आर्थिक मदत असल्याचे त्या वेळी राष्ट्रसंघाने म्हटले होते. २६-११च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर भारताने मसूदबाबतचा प्रस्ताव प्रथम सुरक्षा समितीपुढे मांडला. त्या वेळी चीननेच व्हेटो वापरून पाकिस्तानला पर्यायाने मसूदला मदत केली होती. त्यानंतरही मसूद पाकिस्तानातातून भारताविरुद्ध खुलेआम कारवाया करीत होता. या पार्श्‍वभूमीवर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर केल्याने आता नेमके काय साध्य होणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. 

आंतरराष्ट्रीय दहशतवादी असलेल्या व्यक्तीची संपत्ती तत्काळ जप्त केली जाते. याचा अर्थ मसूदची जगभरातील संपत्ती आहे ती आता जप्त करणे शक्‍य होणार आहे. त्याचप्रमाणे अशा व्यक्तीला तसेच त्याच्याशी संबंधितांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळणार नाही, याची काळजी घेतली जाते. सध्या मसूद पाकिस्तानात खुलेआम आर्थिक मदत गोळा करतो. आता त्याला अटकाव बसेल. तसेच पाकिस्तानला मसूदची संपत्ती जप्त करावी लागेल. त्याचप्रमाणे त्याला अन्य घटकांकडून आर्थिक मदत होणार नाही, याचीही काळजीही आता पाकिस्तानला घ्यावी लागणार आहे. यातून मसूदची आर्थिक नाकेबंदी करणे शक्‍य होणार आहे. 

जागतिक दहशतवादी कोणत्याही देशाला भेट देऊ शकत नाही. दुसरे देशही संबंधित व्यक्तीला आपल्या देशात प्रवेश करू देत नाहीत. अशा व्यक्तीला शस्त्रपुरवठा करण्यासही सर्व देशांना मनाई असते. संबंधित व्यक्ती शस्त्रखरेदी करीत असेल, तर त्याला तत्काळ रोखण्यात येते. आता मसूदला तसेच त्याच्या संघटनेला शस्त्रास्त्रांची मदत होऊ शकणार नाही. ‘जैशे महंमद’कडे अद्ययावत शस्त्रे, तंत्रज्ञान कोठून येते हे उघड गुपित आहे. आता हा शस्त्रपुरवठा रोखला जाईल, अशी आशा आहे. 

अशा व्यक्तीस कोणत्याही देशाने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या शस्त्रास्त्रे, त्यांचे सुटे भाग देऊ नयेत. तसेच त्याला कोणत्याही प्रकारचे लष्करी प्रशिक्षण देऊ नये, असे बंधन आहे. त्यामुळे मसूदला आता पाकिस्तानातून तसेच अन्य देशांकडून शस्त्रपुरवठा होणे दुरापास्त होईल. त्याला तेथे प्रशिक्षण केंद्रही चालविता येणार नाही. मसूदची अशाप्रकारे चोहोबाजूने कोंडी व्हावी यासाठीच भारत प्रयत्न करीत होता. त्याला आता यश आल्याने मसूदप्रमाणेच पाकिस्तानचीही मोठी कोंडी झाली आहे. सुरक्षा समितीच्या निर्णयाची पाकिस्तानने तंतोतंत अंमलबजावणी केल्यास ‘जैशे महंमद’चे कंबरडे मोडणे सहज शक्‍य होणार आहे. दहशतवादाला आपला देश थारा देत नसल्याचा आव तरी पाकिस्तान सतत आणत असतो. त्यामुळे मसूदला खिळखिळे करताना पाकिस्तानची आता जागतिक समुदायापुढे कसोटी लागणार आहे. मसूदला पाकिस्तान अटक करणार का, त्याची रसद तोडणार का, हे पाहणे आता गरजेचे आहे. अमेरिकेने ज्याप्रमाणे जागतिक दबाव टाकत ‘अल्‌ कायदा’चे अस्तित्व पुसून टाकले, त्याचप्रमाणे आता मसूदला खिळखिळे करण्यासाठी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी भारताला प्रयत्न करावे लागणार आहेत.

Web Title: Article Dhananjay Bijle on Terrorist Pakistan

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com