एमआयएम सोडून एकत्र येण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा सुरू - अशोक चव्हाण

एमआयएम सोडून एकत्र येण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा सुरू - अशोक चव्हाण

औरंगाबाद - राज्यातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी येत्या आठ-दहा दिवसांत निश्‍चित होणार आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोडून महाआघाडीत यावे, याबाबत त्यांच्याशी बोलणी सुरू आहे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट केली. लोहारा (जि. उस्मानाबाद) येथे रविवारी (ता. १७) झालेल्या जनसंघर्ष सभेत ते बोलत होते. 

मागील वर्षी जुलै महिन्यात वंचित आघाडीची स्थापना झाली व पहिली जाहीर सभा औरंगाबादेत झाली. त्यावेळी झालेली गर्दी पाहता, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मतांची विभागणी होणार याची अटकळ लावली जात होती. त्यानंतर काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांशी आघाडीबाबत चर्चा सुरू केली. मात्र, प्रारंभी त्यांनी आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस नको, अशी भूमिका घेतली होती. पुढे छगन भुजबळ यांनीही महाआघाडीसाठी प्रयत्न सुरू केले. ॲड. आंबेडकरांनी बारा जागांची मागणी करीत ३० जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा, असे म्हटले होते.  त्यामुळे वंचित आघाडीला बारा जागा दिल्यानंतर महाआघाडीत सहभागी होणाऱ्या इतर पक्षांनाही काही जागा सोडाव्या लागणार असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने किती जागा लढवायच्या, असा पेच काँग्रेससमोर उभा राहिला. मुंबईत २९ जानेवारीला ॲड. प्रकाश आंबेडकरांसोबत अशोक चव्हाण, छगन भुजबळ, माणिकराव ठाकरे यांची जागावाटपाबाबत चर्चा झाली. मात्र ॲड. आंबेडकर बारा जागांवर ठाम राहिल्याने आघाडीची चर्चा थांबली की काय, असे बोलले जाऊ लागले.   

आघाडीसाठी ३० जानेवारीची दिलेली मुदत संपल्यानंतर ॲड. आंबेडकरांनी उमेदवार जाहीर करण्यास लातूरपासून सुरवात केली. शनिवारी (ता. १६) परभणीत झालेल्या मेळाव्यात ॲड. आंबेडकरांनी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासह मराठवाड्यातील पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. तसेच काँग्रेस पक्ष चार जागा देण्यास तयार झाला पण आम्ही सालगडी नाहीत, असे सांगत वंचित आघाडीच काँग्रेसला चार जागा देणार आहे. त्या मुकाट्याने घ्या; अन्यथा फजिती करून घ्या, असा टोलाही आंबेडकरांनी लगावला. त्यामुळे वंचित आघाडी आता महाआघाडीत येणार नाही, असे बोलले जाऊ लागले होते. या पार्श्वभूमीवर आज लोहाऱ्यात अशोक चव्हाणांनी, तर कोल्हापुरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ॲड. आंबेडकरांशी चर्चा सुरू असून येत्या आठवडाभरात महाआघाडी निश्‍चित होईल,’ असे वक्तव्य केले. यामुळे काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत मतविभागणी टाळण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसते. याला कितपत यश येते, हे आठवडाभरानंतरच कळेल.

Web Title: ashok chavan discussion with Ambedkar to come together without MIM

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com