औरंगाबादकर तरुणांनो, जरा संभालके! 

माधव सावरगावे
बुधवार, 13 मे 2020

औरंगाबाद शहरात सध्या एकूण रुग्णांपैकी १ ते १० वयोगटातील ४९ कोरोना बाधित आहेत. त्यानंतर ११ ते २० या वयोगटातील ९८ तर ‘यंग अँड डायनॅमिक’ असणाऱ्या १४१ तरुणांना कोरोनामुळे उपचार घेण्याची वेळ आली आहे.

औरंगाबाद शहरात महिनाभरापूर्वी बोटावर मोजण्याइतकी कोरोना बाधितांची संख्या होती. टप्प्याटप्प्याने ती वाढत गेली. जातेय. आता या आकड्याने शहरवासीयांसोबतच आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची चिंता वाढवली आहे. त्यातच औरंगाबाद शहरातील तरुणांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. आज शहरात कोरोनाने आपला आकडा ६७७ पर्यंत नेऊन पोहचवला. १७ जणांचा जीव घेतला. आता तरुणांना जबर विळखा घालत असल्याचे लक्षात आले आहे. 

शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण संख्येपैकी तब्बल ४९.८ टक्के म्हणजेच ३३६ रुग्ण हे तरुण आहेत. म्हणजे अर्धी संख्या ही प्रतिकारशक्ती उत्तम असणारे, कोणत्याही रोगाला सहज हरवणारे तरुण कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. या तरुण रुग्णांचे वय २१ ते ४० वर्ष आहे. त्यापाठोपाठ ११ ते २० या वयोगटातील रुग्णांची संख्या ही १४.५ टक्के म्हणजेच ९८ रुग्ण इतकी आहे. ज्यांच्या अंगी शक्ती असते, त्यांनाच कोरोनाने जाळ्यात ओढले. या तरुणांच्या रुग्ण संख्येमुळे औरंगाबाद शहरातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी ही चक्रावून टाकणारी आहे. आतापर्यंत कोरोनाचे संक्रमण वयोवृद्ध व्यक्तींना अधिक वेगाने होते, असे सांगितले जात होते. मात्र, औरंगाबाद शहरात त्याउलट घडले आहे. 

औरंगाबाद शहरात सध्या एकूण रुग्णांपैकी १ ते १० वयोगटातील ४९ कोरोना बाधित आहेत. त्यानंतर ११ ते २० या वयोगटातील ९८ तर ‘यंग अँड डायनॅमिक’ असणाऱ्या १४१ तरुणांना कोरोनामुळे उपचार घेण्याची वेळ आली आहे. त्यानंतर ३१ ते ४० या वयोगटातील १९५ तरुण कोरोना बाधित झाले. ४१ ते ५० यातील रुग्ण संख्याही वाढलेलीच आहे. त्यांचा आकडा हा ७७ इतका आहे. मात्र, ज्यांना अधिक धोका आहे, असे बोलले जात होते, त्या वयोवृध्द रुग्णांची तरुणापेक्षा संख्या कमी आहे. मात्र, कोरोना बळीचा धोका या वयोवृद्ध व्यक्तींना वाढला आहे. सध्या ६१ ते ८० या वयातील रुग्णांची संख्या ही ५९ इतकी आहे. त्यापेक्षा जास्त वयाच्या वयाच्या ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यात ५० वयापेक्षा जास्त वय असलेल्या १७ जणांचा कोरोनाने बळी घेतला. 

गेल्या ५५ दिवसांपासून लॉकडाऊनच्या काळात अनेक तरुण विविध काम करीत आहेत. काहीचा वावर हा लोकांमध्ये अधिक असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली. काही जण अनावश्यक बाहेर फिरताना दिसत आहेत. काही जण वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने कोरोनाबाधितांच्या संपर्कात येत असल्याने तरुणांची संख्या ही वाढत चालली आहे. सुदैवाने मृत्यूचं प्रमाण मात्र तरूणामध्ये नाही. त्यामुळे धोका टळतोय असेही नाही. हा विचार करून औरंगाबाद शहरातील तरुणांनी जरा अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

याबाबत ‘घाटी’च्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या,

‘शहरात सध्या कोरोनाबाबतच्या ‘टेस्टिंग’चे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे अधिक तरुण हे ‘डीटेक्ट’ होत आहेत. जर ‘टेस्टिंग’ केले नसते तर या तरुणांना त्रास झाला नसता. हे सगळे सौम्य लक्षणाचे कोरोना बाधित म्हणून राहिले असते. यात अनेकांना काहीही लक्षणे दिसत नाहीत. यातल्या अनेक तरुणांना अधिक त्रास होत नाही. त्यांना कोरोनाची लक्षण दिसत नाहीत. मात्र, हे खरे की औरंगाबादमध्ये कोरोना बाधितांमध्ये तरुण जास्त आहेत.’

कोरोनाने जगभरात थैमान घालत असताना प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वसामान्यपणे रोग प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक असल्याचे सांगितले जाते. काही दिवसापूर्वी कोणत्यातरी ब्लड ग्रुपच्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचेही सांगितले गेले. याबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर समोर आले नाही. जगभरातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीवरून वृद्ध व्यक्तींना कोरोना व्हायरसचा धोका इतरांपेक्षा थोडा जास्त आहे, त्यांची संख्याही जास्त आहे, हे समोर आले आहे. आता मात्र, औरंगाबाद शहरातील संख्येवरून सर्वच वयोगटातील लोकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाच्या संक्रमणाचे आणि संक्रमकांचे तुम्ही बळी पडाल. 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live