बोटाच्या अंगठ्यावर कर्जमाफी देण्याची पहिलीच वेळ : आमदार काळे

सरकारनामा
गुरुवार, 5 मार्च 2020

कोपरगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांना एवढ्या कमी कालावधीत, कमीत कमी कागदपत्रांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भरपाई मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना बोटाच्या अंगठ्यावर कर्जमाफी देऊन मोठा दिलासा दिला अशी स्तुती आमदार आशुतोष काळे यांनी केली

 

कोपरगाव : "कोपरगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांना एवढ्या कमी कालावधीत, कमीत कमी कागदपत्रांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भरपाई मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना बोटाच्या अंगठ्यावर कर्जमाफी देऊन मोठा दिलासा दिला. या कर्जमाफीचा लाभ असंख्य शेतकऱ्यांना झाला. या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत,'' असा निर्धारही आमदार आशुतोष काळे यांनी येथे व्यक्त केला. 

काळे म्हणाले, "शेतकऱ्यांच्या प्रश्नांची व अडचणींची जाणीव असणारे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाल्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी व पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून तब्बल ४१ कोटी ५८ लाख रुपये भरपाई मिळाली.''

"मागील वर्षी 2019-20च्या संपूर्ण खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. निवडणुकीच्या निकालानंतर आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. महसूल विभागाला नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शेतकऱ्यांच्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी, यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश आले,'' असेही काळे म्हणाले.

''तालुक्‍यातील ३७ हजार ५५४ शेतकऱ्यांना शासनाकडून पहिल्या टप्प्यात आठ कोटी २८ लाख व दुसऱ्या टप्प्यात १९ कोटी ६७ लाख रुपये, असे एकूण २७ कोटी ९५ लाख रुपये भरपाई मिळाली आहे. तालुक्‍यातील शेतकरी पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये सहभागी झाले होते. या योजनेत सहभागी झालेल्या जवळपास १५ हजार ४९५ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून १३ कोटी ६३ लाख ६४ हजार रुपये मिळाले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून तीन महिन्यांतच तालुक्‍यातील शेतकऱ्यांना ४१ कोटी ५८ लाख रुपयांचा लाभ झाला आहे.'' अशीही माहिती आमदार काळे यांनी दिली.
 

WebTittle ::  Aushutosh Kale Praises Loan Waiver Scheme


संबंधित बातम्या

Saam TV Live