आईच्या रक्तासाठी मुलाची धावपळ... अन्‌ कर्मचारी अडले कागदपत्रांसाठी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 मार्च 2020

आईला दोन पिशव्या रक्त लागणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्यानंतर मुलगा जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील रक्तपेढीत गेला.तिथून त्याला केवळ धावपळच करावी लागली.

जळगाव : आईला रक्ताची आवश्‍यक असल्याने सकाळपासून रक्त मिळविण्यासाठी मुलाची धावपळ सुरू होती. बरीच धावपळ केल्यानंतर दोन रक्तदाते देखील मिळाले, मात्र त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे सांगत अगोदर कागदपत्रांची पूर्तता करा, त्यानंतरच रक्त लावले जाईल, यावर आडून बसलेल्या परिचारिकेकडून त्या महिला रुग्णास रक्त लावण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार आज सायंकाळच्या सुमारास जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात पहावयास मिळाला. 

आर्थिक दुर्बल घटकातील गरजू रुग्णांसाठी जिल्हा वैद्यकीय रुग्णालय हा एक आशेचा किरण असून, याठिकाणी रुग्णावर मोफत उपचार केले जातात. या आशेमुळे दररोज जिल्हाभरातून हजारो रुग्ण उपचारासाठी याठिकाणी येऊन उपचार घेतात. त्यामुळे जिल्हा वैद्यकीय रुग्णालयाची प्रतिमा संपूर्ण जिल्हाभरात गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून निर्माण झाली आहे. धरणगाव तालुक्‍यातील मालूबाई रमेश पाटील (वय 42) या महिलेची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील वार्ड क्रमांक 13 मध्ये दाखल करण्यात आले. दोन दिवस याठिकाणी उपचार घेतल्यानंतर आज दुपारच्या सुमारास डॉक्‍टरांनी त्यांची तपासणी केली, असता त्यांना दोन पिशव्या रक्त लागणार असल्याचे डॉक्‍टरांनी त्या महिलेचा मुलगा अमोल यास सांगितले. 

रक्तासाठी दिवसभर हेळसांड 
आईला दोन पिशव्या रक्त लागणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्यानंतर अमोल त्याच्या आईसोबत जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील रक्तपेढीत गेला. याठिकाणी अमोल यास सायंकाळी साडेपाचला रक्त घेण्यासाठी ये, असे सांगण्यात आले. दरम्यान, अमोल हा कागदपत्र घेऊन त्याठिकाणी नियुक्त असलेल्या परिचारिकेकडे गेला असता परिचारिकेने अमोल यास आठशे रुपयांची पावती घेऊन येण्यास सांगितले. परंतु रक्तपेढीतून पावती मिळत नसल्याने तो पुन्हा परिचारिकेकडे पावती मिळत नसल्याचे सांगितले. यावेळी परिचारिकेकडून पावती लागेल त्यानंतरच रक्त लावेल, अशी भूमिका घेत त्या महिला रुग्णाची दिवसभर हेळसांड सुरू होती. 

अन्‌ संतापात फाडली कागदपत्रे 
सकाळपासून पावती व कागदपत्रांसाठी आडून बसलेल्या परिचारिकेला वारंवार विनंती करून देखील सायंकाळपर्यंत परिचारिका रुग्णाची दखल घेण्यास तयार नव्हत्या. तसेच दिवसभर रक्तदाते मिळविण्यासाठी अमोलची वणवण झाली होती. जळगावातील काही मित्रांच्या मदतीने रक्तदाते देखील मिळाले. मात्र, आईची प्रकृती खालावत असल्याने आणि पावतीसाठी आडून बसलेल्या परिचारिकेच्या धोरणामुळे अमोल याने संतापाच्या भरात जिल्हा रुग्णालयातच संताप व्यक्त करीत उपचाराची सर्व कागदपत्रे फाडून फेकली. 

पावती आणा... नाही तर "मोफत' असे लिहून आणा 
अमोल याने संतापाच्या भरात सर्व कागदपत्रे फाडून फेकल्यानंतर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात मोफत उपचार भेटतात. परंतु याठिकाणी गरिबाची दखल घेण्यास कोणीच तयार होत नसल्याचे सांगून तो आपली व्यथा उपस्थितांसमोर मांडत होता. दरम्यान, यावेळी याठिकाणी उपस्थित पत्रकारांनी त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने त्याच्यासोबत झालेली सर्व व्यथा पत्रकारांसमोर मांडली. यावेळी त्या पत्रकारांनी त्या परिचारिकेकडे जाऊन याबाबत विचारणा केली असता त्यांनी रक्तपेढीची पावती आणावी किंवा त्या ठिकाणावरून रक्त मोफत आहे, असे लिहून आणावे, आम्ही त्यांच्यावर उपचार करू असे सांगितले. 

रक्तदाते असल्यास रक्त मोफत 
रक्तपेढीतून रुग्णाला रक्ताची आवश्‍यकता असल्यास त्याला रक्ताचा पुरवठा केला जातो. दरम्यान, रुग्णाकडे रक्तदाते असल्यास त्याला रक्तपेढीतून मोफत रक्ताचा पुरवठा केला जातो, अन्यथा त्याच्याकडून काही विशिष्ट रक्कम वसूल करीत पावती दिली जात असल्याचे त्याठिकाणावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच आम्ही रक्तासाठी कधीच रुग्णाची अडवणूक करीत नाही, केवळ त्याच्या कागदपत्रांवर याबाबत नमूद करीत असल्याचे सांगितले. 

त्यानंतरच मारला जातो "मोफत'चा शेरा 
रुग्ण रक्त घेऊन गेल्यानंतर त्याने रक्तदाते रक्तपेढीस आणून दिल्यास, त्याच्या कागदपत्रांवर मोफत, असा शेरा लावला जातो तसेच रक्त घेत असताना त्याच्या कागदपत्रांवर रक्त देण्याबाबत नमूद केले जात असते. परंतु रक्त मिळण्याआधीच परिचारिकेकडून कागदपत्रावर शेरा मारावा व त्यावर लिहून आणण्यासाठी आडून बसल्या होत्या. 

 

WEB TITLE- Boy run for mother's blood...


संबंधित बातम्या

Saam TV Live