वांद्रे किल्ला सुशोभीकरण - भाजपचा प्रस्ताव शिवसेनेने रोखला 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

वांद्रे किल्ला परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी भाजपने केलेला आटापिटा निष्फळ ठरला आहे. भाजपच्या प्रस्तावाविरोधात विरोधकांनी मांडलेल्या उपसूचनेला सत्ताधारी शिवसेनेने पाठिंबा दिला. उपसूचना बहुमताने मंजूर झाल्यामुळे हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला

मुंबई : वांद्रे किल्ला परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी भाजपने केलेला आटापिटा निष्फळ ठरला आहे. राज्यात असूनही महापालिकेत नसलेली महाविकास आघाडी शुक्रवारी (ता. 14) स्थायी समितीत दिसली. भाजपच्या प्रस्तावाविरोधात विरोधकांनी मांडलेल्या उपसूचनेला सत्ताधारी शिवसेनेने पाठिंबा दिला. उपसूचना बहुमताने मंजूर झाल्यामुळे हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला.

मुंबईतील वांद्रे येथे पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आजही तग धरून आहे. या किल्ल्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने शुक्रवारी स्थायी समिती बैठकीत आणला होता. सुशोभीकरणात वांद्रे किल्ल्याच्या परिसरातील मोडकळीला आलेली संरक्षक भिंत पाडून पुन्हा उभारली जाणार आहे. शोभिवंत जाळ्या, सुशोभित प्रवेशद्वार, शौचालये, गांडूळखत तयार करण्यासाठी खड्डा, बसाल्ट दगडाचे पदपथ, वारसा वास्तू सूत्रानुसार दिशा, चिन्हे आणि नावांच्या पट्ट्या, पाणवठे, बैठक व्यवस्थेची दुरुस्ती, विजेचे दिवे, हिरवळ आदी कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी 20 कोटी रुपये खर्च येणार आहे.

कॉंग्रेसच्या असिफ झकेरिया यांनी उपसूचना मांडून या प्रस्तावाला आक्षेप घेतला. सुशोभीकरण करताना तेथे अनेक वर्षांपासून उभ्या राहिलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन कसे करणार? मेरिटाईम बोर्डाची परवानगी आहे का, असे सवाल त्यांनी केले. पाच कोटींच्या खर्चाने केली जाणारी दिवाबत्तीची व्यवस्था फार काळ टिकणार नाही. अन्य काही प्रश्‍नांची सोडवणूक कशी करणार, याबाबत प्रस्तावात स्पष्टता नाही, असे ते म्हणाले. वांद्रे किल्ल्याचा विकास अन्य किल्ल्यांसह एकत्रित केल्यास योग्य ठरेल, असे सांगत झकेरिया यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली.

भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी झकेरिया यांच्या उपसूचनेला विरोध करत किल्ल्याच्या सुशोभीकरणात राजकारण आणू नये, असे सांगितले. सत्ताधारी शिवसेनेने विरोधकांना साथ देऊन प्रस्तावाची नोंद करण्याच्या उपसूचनेला पाठिंबा दिला. सुशोभीकरण करताना तेथील 300 झोपड्यांचे पुनर्वसन कसे करणार? त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आपल्याकडे घरे आहेत का, असे प्रश्‍न सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी उपस्थित केले. मुंबईत अन्य किल्लेही आहेत; या सर्व किल्ल्यांच्या सुशोभीकरणाचा एकत्रित प्रस्ताव आणावा, अशी सूचना त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या वांद्रे येथील घराजवळील किल्ल्यापासून सुशोभीकरणाला सुरुवात करायला हवी. या भागात भाजप नेते आशीष शेलार यांच्यासह काही चित्रपट कलाकारही राहतात. त्यामुळे वांद्रे किल्ल्यापासून सुरुवात करावी, असे सांगण्यात आले. इतर किल्ल्यांचाही विकास व्हावा, असे सांगत भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी उपसूचनेला विरोध केला. सुशोभीकरणाच्या कामात 60 टक्के 'सिव्हिल वर्क' आहे. मलबार हिल येथील मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानापासून कामाला सुरुवात करण्यास काय हरकत आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. तेथे आशीष शेलार आणि असिफ झकेरियाही राहत असल्याकडे राजा यांनी भाजपचे लक्ष वेधले.

किल्ल्यांचे संवर्धन करायचे असल्यास वांद्रे किल्लाच का? हा प्रस्ताव कोणी सुचवला आहे? असे प्रश्‍न स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपला उद्देशून केले. विरोधकांना सत्ताधारी शिवसेनेने साथ दिल्यामुळे शुक्रवारी राज्यातील महाविकास आघाडी मुंबई महापालिकेतही दिसली. भाजपचे नेते आशीष शेलार यांच्या मतदारसंघात असल्याने वांद्रे किल्ल्याचा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न भाजप नगरसेवकांनी केला; परंतु सत्ताधारी व विरोधकांच्या एकीमुळे भाजपचा आटापिटा दुसऱ्यांदा निष्फळ ठरला. असिफ झकेरिया यांची उपसूचना बहुमताने मंजूर झाली. दरम्यान, त्रुटी दूर करून प्रस्ताव पुन्हा आणावा, असे जाधव यांनी सांगितले.

वांद्रे येथील किल्ला पोर्तुगीजांनी 1640 मध्ये बांधला. सी-लिंक आणि अरबी समुद्रामुळे या किल्ल्याला सौंदर्य प्राप्त झाले आहे. या किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, त्याचे कंत्राट ए. पी. आय. सिव्हिलकॉन या कंपनीला दिले जाणार होते. सुमारे 20 कोटी रुपये खर्चून हे काम 18 महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रस्ताव होता.

WebTittle :: Bandra Fort Renovation Row in Mumbai Corporation


संबंधित बातम्या

Saam TV Live