बारामतीत कोरोनाचा स्फोट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण....

Corna Checking
Corna Checking

बारामती : बारामतीत एकाच दिवसात 149 पाॅझिटीव्ह रुग्ण  आढळले आहे. आतापर्यंत बारामतीत 9254 रुग्ण आढळले, यापैकी 162 मृत्यू तर 7970 बरे झाले आहेत. यामुळे बारामती करांनी आता खरी कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मात्र बारामती कर नियमांचं पालन करताना पहायला मिळत नाहीत. (Baramati Corona Cases Rising)

मात्र, तरीही लॉकडाऊन (Baramati Lockdown) अजिबात नको असा समाजमनाचा सूर आहे. शहर व तालुक्यातील कोरोना (Corana) रुग्णांचा आकडा वाढत असताना आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. लोकांनी शिस्त न पाळल्यास नाईलाजाने पुन्हा लॉकडाऊनकडे जावे लागेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

दुसरीकडे समाजातून मात्र लॉकडाऊनला तीव्र विरोध असून इतर पर्यायांचा विचार व्हायला हवा असा सूर उमटत आहे. बारामतीत लॉकडाऊन हवा की नको या बाबत आज समाजमनाचा कानोसा घेतल्यानंतर बहुसंख्य लोकांनी लॉकडाऊन नको अशीच भूमिका मांडली आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा अनलॉक केल्यानंतर ही संख्या आटोक्यात येईल याची काय शाश्वती आहे. असा अनेकांचा सूर होता. परंतु निर्बंध जरुर घाला पण पूर्ण बंदची भूमिका नकोच असेच मान्यवरांनी नमूद केले आहे. (Baramati Corona Cases Rising)

गरज असल्यास शनिवार-रविवार बंद ठेवायची तयारी आहे, वेळेचे बंधनही व्यापारी पाळतील, पण पूर्ण लॉकडाऊनची कोणाचीच मानसिकता नाही. आर्थिक नुकसान तर होईलच पण हा खरच पर्याय आहे का याचा विचार व्हायला हवा, असे नरेंद्र गुजराथी, अध्यक्ष, बारामती व्यापारी महासंघ यांनी सांगितले

मार्केट बंद ठेवू नये..
बारामतीतील मार्केटयार्ड लॉकडाऊनमुळे बंद राहिले तर त्याचा थेट फटका शेतक-यांना बसतो.  मालाचे दर वाढतात, त्याचा फटका ग्राहकांना बसतो, त्या मुळे मार्केट बंद करणे हे न परवडणारे आहे. कोरोनाचे सगळे नियम आम्ही पाळत आहोत, असा दावा महावीर वडूजकर, अध्यक्ष, मर्चंटस असोसिएशन, बारामती यांनी केला.

छोटे व्यावसायिक देशोधडीला लागतील...
गेले वर्षभर लॉकडाऊनने प्रचंड नुकसान झाले आहे. लॉकडाऊन ऐवजी इतर पर्यायांचा प्रशासनाने विचार करावा, आणि पूर्ण बंद केल्याने छोटे व्यावसायिक देशोधडीला लागतील. किमान निर्बंध असावेत, जेणेकरुन नुकसान कमी होईल. आम्ही कोरोनाचे सगळे नियम पाळतच आहोत, असे हाॅटेल व्यावसायिक गिरीश कुलकर्णी म्हणाले. (Baramati Corona Cases Rising)

बारामती दृष्टीक्षेपात......
•    शासकीय व खाजगी रुग्णालयात मिळून 814 बेडस उपलब्ध
•    सध्या सर्व ठिकाणी मिळून 780 रुग्ण दाखल. 
•    ऑक्सिजनवर असलेले रुग्ण 82 व्हेंटीलेटरवर 16 रुग्ण
•    एकूण 1186 रुग्ण उपचाराखाली आहेत. 
•    बारामतीतील कोव्हिड केअर सेंटरची क्षमता 733 दाखल  रुग्ण 406.
•    कोरोना सुरु झाल्यापासून बारामतीत झालेल्या तपासण्या 52134 या पैकी 9365 रुग्ण पॉझिटीव्ह- हे प्रमाण 18 टक्के आहे. 
•    मार्च महिन्यात 15415 तपासण्या झाल्या त्यात 2164 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले, हे प्रमाण सरासरी 14 टक्के आहे. 
•    आज 270 रुग्णांच्या तपासण्या झाल्या त्या पैकी 111 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले, हे प्रमाण 41 टक्के आहे, कालचे प्रमाण 23 टक्के होते. 
•    कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण 10 ट्क्क्यांहून कमी असले तर कोरोना आटोक्यात आहे, असे समजले जाते. 
•    बारामती तालुक्यात 4 तर शहरात 18 कोरोना हॉटस्पॉट.

दरम्यान कोरोना रोखण्यासाठी अधिका-यांवर जबाबदारी द्यायची गरज आहे. कोरोना साथीच्या काळात ठराविक अधिका-यांचा अपवाद वगळता इतर अधिकारी कोठेच दिसत नाहीत. शासनाच्या सर्वच अधिका-यांवर  समान प्रमाणात जबाबदारीचे वाटून दिल्यास ,त्याचा परिणाम दिसू शकेल. आरोग्य विभागाशी संबंधित नसले तरी आपत्ती व्यवस्थापन प्रक्रीयेत सर्वच अधिका-यांवर समान जबाबदारी आता द्यायला हवी, अशी ही मागणी होत आहे. 

Edited By-Digambar Jadhav
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com