भाजप-सेनेचे काय ठरले नाही तर आम्ही पुढील विचार करू -पृथ्वीराज चव्हाण

भाजप-सेनेचे काय ठरले नाही तर आम्ही पुढील विचार करू -पृथ्वीराज चव्हाण

कऱ्हाड:  भाजप-शिवसेनेतील मतभेद हे टोकाला गेले आहेत. एकमेकांविरुद्ध आरोप- प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्राला हे शोभणारे नाही. भाजप-सेनेच्या युतीमध्ये बेबनाव आहे. महाराष्ट्रासमोर अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानीचा प्रश्न गंभीर झाला आहे, तरीही पदांसाठी मारामारी सुरू आहे. भाजप-शिवसेना सत्तेत बसले, तर आम्ही विरोधी पक्षात बसू. भाजप-सेनेचे काय ठरले नाही तर आम्ही पुढील विचार करू, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले. दरम्यान, शरद पवार व चव्हाण यांच्यात आज (ता. 7) येथे बैठक होणार आहे. 

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर श्री. चव्हाण हे पत्रकारांशी बोलत होते. संख्याबळ असलेल्या पक्षांनी आपसातील मतभेद बाजूला सारून पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. मात्र, ते होताना दिसत नाहीत, असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, "भाजप- सेनेच्या युतीमध्ये बेबनाव झाला आहे. युती होताना काय ठरले होते, याबाबत उलटसुलट विधाने होत आहेत. त्यामध्ये कोण खरं आणि कोण खोटं हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. महाराष्ट्रासमोर अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान हा गंभीर प्रश्न उभा आहे, तरीही पदांसाठी मारामारी सुरू आहे. विधानसभेची मुदत दोन दिवसांत संपेल. नवीन सरकार त्या दरम्यान स्थापन झाले पाहिजे. मुख्यमंत्री नियुक्ती झाली नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आमच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय नेत्यांनीही आम्ही परिस्थिती सांगितली आहे. आमचे संख्याबळ काय आहे, ते सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे संख्याबळ आहे ते निर्णय घेतील. ते सत्तेत बसले तर आम्ही विरोधी पक्षात बसू. भाजप-सेनेचे काय ठरले नाही तर आम्ही पुढील विचार करू.'' 

कऱ्हाडात आज पवार-चव्हाणांची बैठक 
भाजप-शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या बैठकांही वाढल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज (ता. 7) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची येथे बैठक होणार आहे. राज्यातील सत्ता स्थापनेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

Web Title: Congress leader Prithviraj Chavan talked about Shivsena BJP alliance

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com