आता गाड्या पार्क करायच्या कुठे? 

आता गाड्या पार्क करायच्या कुठे? 

पुणे - अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडत असतानाच ठेकेदाराने भाडे थकविल्याने महात्मा फुले मंडईतील (कै.) सतीशशेठ धोडिंबा मिसाळ वाहनतळ महिनाभरापासून बंद आहे. नोटीस बजावून टाळे ठोकलेल्या या वाहनतळाचा ताबा घेऊन तो सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हात आखडता घेतला आहे. परिणामी, वाहनतळ बंद असून या परिसरात येणाऱ्या वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. नव्या ठेकेदाराऐवजी महापालिकेनेच वाहनतळ चालविण्याचा प्रस्तावही प्रशासनातील वादामुळे पुढे सरकला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शहरातील वाहनसंख्या ३३ लाखांच्या घरात आहे; तर पार्किंगव्यवस्था ३० हजार वाहनांकरिता असल्याचे महापालिकेकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यात सुमारे दीड हजार चारचाकी आणि दुचाकींची पार्किंगव्यवस्था असलेल्या मिसाळ वाहनतळाचा समावेश आहे. हा भाग वर्दळीचा असल्याने या वाहनतळाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. 

त्यामुळे या भागातील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत राहण्यास मदत होते; परंतु वाहनतळाच्या ठेकेदाराने ४६ लाख रुपयांचे भाडे थकविल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. ती भरण्याबाबत ठेकेदाराला वारंवार सूचना करण्यात आल्या. मात्र, राजकीय दबाव आणत ठेकेदाराने भाड्याची थकबाकी भरण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर गेल्या महिन्यात महापालिकेच्या मिळकत विभागाने वाहनतळाला टाळे ठोकून, नव्या ठेकेदाराची नेमणूक करण्याच्या हालचाली केल्या. या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने तूर्तास महापालिकेने आपल्याकडील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाहनतळ चालविण्याच्या सूचना स्थायी समितीने केल्या. त्यासाठी सुरक्षारक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांची मागणी मिळकत विभागाने केली. मात्र, मागणीनुसार कर्मचारी देण्यास सुरक्षा विभागाने नकार दिल्याने वाहनतळ सुरू करण्यात अडचणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

वाहनतळ सुरू करण्यासाठी कर्मचारी पुरविण्याची मागणी केली आहे. ते उपलब्ध झाल्यानंतर वाहनतळ सुरू होईल. नव्या ठेकेदाराची नेमणूक करण्यास तीन-चार महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे महापालिकाच वाहनतळ सुरू करणार आहे.
- राजेंद्र मुठे, उपायुक्त, महापालिका

वाहतूक कोंडीत भर 
गणेशोत्सवात महात्मा फुले मंडई, शिवाजी रस्ता आणि परिसरात मोठी गर्दी होते. शहरासह बाहेरगावांहून येणारे भाविक वाहने घेऊन येतात. त्यांच्याकडील वाहनांच्या सोयीसाठी महापालिकेचे येथील दोन्ही वाहनतळ सोयीचे ठरतात. मात्र, मिसाळ वाहनतळाजवळ आल्यानंतर ते बंद असल्याचे सांगितले जात असल्याने वाहनचालकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यानंतर वाहन कुठे उभे करायचे, या प्रश्‍नामुळे वाहनचालक गोंधळून जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे चित्र आहे. 

Web Title: parking issue Ganesh festival in pune

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com