चिदंबरांची तिहार तुरुंगात रवानगी  

चिदंबरांची तिहार तुरुंगात रवानगी  


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकपूर्व जामीन नाकारत दिल्ली न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केल्याने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना जोरदार धक्का बसला आहे. त्यानंतर दिल्ली न्यायालयाने त्यांची तिहार तुरुंगात रवानगी केली असून त्यांना तेथे १४ दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्य़ाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने २० ऑगस्टला चिदम्बरम यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्या निकालाविरोधात चिदम्बरम यांनी याचिका केली होती.  त्याचबरोबर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदविलेल्या गुन्ह्य़ात अटकपूर्व जामिनासाठीची त्यांची याचिकाही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळली. सीबीआयने  त्यांना २१ ऑगस्टलाच अटक केली होती.

या टप्प्यावर तपास यंत्रणेला चौकशीसाठी पुरेसा वाव देण्याची गरज आहे. आरोपीला जामीन दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांना जामीन देणे योग्य नाही. आर्थिक गुन्हे हे समाजाच्या आर्थिक रचनेवरच आघात करतात. त्यामुळे अशा गुन्ह्य़ांतील आरोपींना जामीन देताना काळजीपूर्वक विचार केला पाहिजे, असे मतही न्या. आर. भानुमती आणि न्या. एस. आर. बोपण्णा यांच्या पीठाने  निकालात नमूद केले.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात शरण येण्याच्या चिदम्बरम यांच्या प्रस्तावावर न्यायालयाने ईडीला नोटीसही जारी केली.

त्यानंतर प्रथम त्यांना सीबीआयच्या कोठडीत पाठवण्यात आले आणि काही तासांनी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहर यांनी त्यांना १९ सप्टेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

चिदम्बरम यांना २१ ऑगस्टला अटक झाली होती. त्यानंतर विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार ते गेले १५ दिवस पाच टप्प्यांमध्ये सीबीआय कोठडीत होते.

एका प्रकरणात जामीन मंजूर

एअरसेल मॅक्सिस प्रकरणात सीबीआय आणि ईडीने नोंदलेल्या गुन्ह्य़ांत मात्र चिदम्बरम आणि त्यांचे पुत्र कार्ति यांना दिल्ली न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. या दोघांनी चौकशीत सहकार्य करावे, असेही न्यायालयाने नमूद केले. जर या प्रकरणात अटक झालीच तर त्यांची एक लाख रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर आणि तेवढय़ाच रकमेच्या हमीवर त्यांची सुटका करावी, असेही न्यायालयाने सांगितले.

झेड सुरक्षा

चिदम्बरम यांना त्यांची औषधे तुरुंगात नेण्याची परवानगी देतानाच, त्यांना झेड दर्जाची सुरक्षा असल्यामुळे त्यांना तिहार तुरुंगात वेगळ्या कक्षात (सेल) ठेवण्यात यावे, असे न्यायालयाने सांगितले. त्यांना तुरुंगात पुरेशी सुरक्षा उपलब्ध करून दिली जाईल, अशी हमी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली.

न्यायदान पद्धतीवर टीका!

चिदम्बरम यांना अटकपूर्व जामीन नाकारण्याचा दिल्ली न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला, मात्र न्या. सुनील गौर यांनी ईडीच्या तक्रारीचे परिच्छेदच्या परिच्छेद निकाल म्हणून उद्धृत केल्याबद्दल तीव्र टीका केली. जामीन मंजूर करण्याची किंवा नाकारण्याची ही योग्य पद्धत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

Web Title:  P Chidambaram Sent To Tihar Jail 
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com