पुण्यात फुटणार भाजपमध्ये दिवाळीनंतर "फटाके' 

पुण्यात फुटणार भाजपमध्ये दिवाळीनंतर "फटाके' 


पुणे - विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघ गमावतानाच अन्य सहा विधानसभा मतदारसंघांतील कामगिरीबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजीचा सूर आळवला असून नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आता हिशेब घेण्यात येणार आहे. मतदारसंघांमधील प्रभागनिहाय मतांचे आकडे जाणून घेताना, मतांचा टक्का कुठे आणि का घसरला, यावर चिंतन होणार आहे. शहरातील आठ मतदारसंघांतील भाजपच्या मतांमध्ये घट झाल्याने दिवाळीनंतर पक्षांतर्गत "हिशेबाचे फटाके' फुटले जाण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, पुढील आठवड्यात राज्यपातळीसह पुण्यातील प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. 

शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार होते. त्यापैकी हडपसर आणि वडगाव शेरी या पक्षाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. पर्वती वगळता अन्य मतदारसंघांत भाजपच्या उमेदवाराला अपेक्षित मताधिक्‍य मिळाले नाही. कोथरूडमध्ये जाहीर केल्यानुसार जेमतेम 15 टक्‍के मताधिक्‍य चंद्रकांत पाटील यांना मिळाले आहे. तर, शिवाजीनगर व पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघांत पाच हजारांचे मताधिक्‍य आहे. कोथरूडसारख्या बालेकिल्ल्यात भाजपची दमछाक झाल्याची बाब पक्षनेतृत्वाने गांभीर्याने घेतली असून, त्यादृष्टीने निवडणुकीतील कामाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून सांगण्यात आले. 

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना कोथरूडमध्ये लाखाहून अधिक, तर पर्वतीत जवळपास 66 हजारांचे मताधिक्‍य होते. अन्य मतदारसंघांतून चांगली मते मिळाली होती. 

राज्यपातळीवरून अभ्यास सुरू 
विधानसभा निवडणुकीत पडझड झाल्याने त्याची कारणे जाणून घेण्यासाठी राज्यपातळीवरील नेत्यांनी अभ्यास सुरू केल्याचे सांगण्यात आले. त्यात प्रत्येक नगरसेवक आणि पक्षसंघटनेतील प्रमुख नेत्यांकडून माहिती मागविण्यात येणार आहे. 


Web Title: BJP votes down in eight constituencies in city
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com