रावसाहेब दानवेंचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सवाल

 रावसाहेब दानवेंचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सवाल


भोकरदन : निवडणुकीच्या आधी ईव्हीएमच्या नावाने रान उठवणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आता ईव्हीएमवर शंका नाही का? आता त्यांचे नेते गप्प कसे? असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. सातारा, बारामती, तासगाव, परळी या ठिकाणचे उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने निवडून आल्यावर आता ईव्हीएमबद्दल आघाडीच्या नेत्यांना आक्षेप नाही का? भाजपला जास्त जागा मिळाल्या तर ईव्हीएम हॅक, आणि स्वतः लाखोंच्या मताधिक्‍क्‍याने निवडून आले तर स्वकर्तृत्वावर का? असा टोलाही दानवे यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर सर्वत्र विजयोत्सव सुरू आहे, सत्ताधारी पक्षाच्या जागा घटल्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आघाडीच्या नेत्यांना 'आता ईव्हीएमवर संशय नाही का?' असे म्हणत चिमटा काढला आहे. 'सरकारनामा'शी बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले, ''निवडणुकीच्या आधी ईव्हीएमच्या नावाने जनतेची विरोधकांनी मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली, याउलट भाजपने जनादेश समजून हा निकाल विनम्रपणे स्वीकारला. आमच्या अपेक्षेप्रमाणे राज्यात महायुती 220 जागांचा टप्पा गाठेल असे वाटत होते. पण आम्हाला 165 जागा मिळाल्या. पण हा निकाल जनादेश माणून आम्ही तो स्वीकारला आहे. निश्‍चितच भाजप व शिवसेनेच्या बंडखोरांमुळे आम्हाला काही प्रमाणात फटका बसला, पण याचा अर्थ लोक आमच्यावर नाराज आहेत असा होत नाही.''

पाच वर्षात केलेली विकास कामे व आगामी काळात होणारी विकासकामे हा विश्वास जनतेला आहे त्यामुळेच महायुतीला त्यांनी स्पष्ट बहुमत दिले आहे. ज्या ठिकाणी बंडखोरी झाली त्या ठिकाणी शिस्तभंग समिती चौकशी करून कारवाई करणार असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com