आता ‘ईपीएफ’वर मिळणार  ८.६५ टक्के व्याज

आता ‘ईपीएफ’वर मिळणार  ८.६५ टक्के व्याज

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) मागील आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत यंदा ०.१० टक्का जादा व्याज देण्यास नुकतीच ‘ईपीएफओ’च्या विश्‍वस्त मंडळाने मंजुरी दिली. ‘ईपीएफ’ व्याजदरवाढीच्या निर्णयाने देशभरातील जवळपास सहा कोटी ‘ईपीएफ’धारकांना दिलासा मिळाला आहे. २०१७-१८ मध्ये ‘ईपीएफ’वर ८.५५ टक्के व्याजदर होता.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २१ फेब्रुवारीला मागील वर्षाकरिता ८.६५ टक्के व्याजदर देण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याला पाठविला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन व्यग्र असल्याने या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्‍वस्त मंडळाने ‘ईपीएफ’ सभासदांना ८.६५ टक्के व्याज देण्यास मंजुरी दिली असल्याचे केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले. लवकरच ८.६५ टक्के व्याज ‘ईपीएफ’ सभासदांच्या खात्यामध्ये जमा केले जाईल. याच व्याजदराने ‘ईपीएफ’ दावे निकाली काढले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दोन कोटी रोजगारांची निर्मिती
वीसहून अधिक कामगार असलेल्या छोट्या उद्योगांमध्ये गेल्या तीन वर्षांत दोन कोटींहून अधिक रोजगार निर्माण झाल्याचा दावा गंगवार यांनी केला. ते म्हणाले की, या छोट्या आस्थापनांमधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सहा कोटींवरून आठ कोटी झाली आहे. असंघटित  क्षेत्रातील ४० कोटी कामगारांच्या कल्याणासाठी सरकार काम करीत आहे. जम्मू-कश्‍मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर आता राज्य कर्मचारी विमा मंडळाकडून (ईएसआयसी) लेह आणि श्रीनगर येथे कामगारांसाठी रुग्णालय उभारले जाईल. 

Web Title: 8.65 percentage interest on epf
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com