मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी महापालिकेचा निर्णय 

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी महापालिकेचा निर्णय 

मुंबई शहर आणि उपनगरातील ५० रस्त्यांचा चेहरामोहरा येत्या तीन महिन्यांत बदलण्यात येणार असून, महापालिकेच्या 'स्ट्रीट लॅब' उपक्रमांतर्गत हे लक्ष्य साध्य केले जाणार आहे. या उपक्रमांतर्गत रस्त्याची गुणवत्ता वाढवून फूटपाथची दुरुस्ती, पार्किंगचे नियोजन आणि सायकल ट्रॅक यांकडे लक्ष दिले जाणार आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकारक करण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

रस्त्यांच्या दुरुस्तीसोबत त्यांच्या सौंदर्यीकरणाचेही काम केले जाणार आहे. रस्ते आणि फूटपाथसह पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्ग डेब्रिजमुक्त करणे, रस्ते दुभाजक बसवणे, नामफलक लावणे, अतिक्रमणे-बेकायदेशीर जाहिरात फलक हटवणे, फूटपाथ आकर्षक बनवण्याचे काम केले जाणार आहे. अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याचे पोलिस खात्याने मान्यही केले आहे.

वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाय योजण्यात येत आहेत. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी बेकायदा पार्किंगवर पाच ते दहा हजारांचा दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच, रस्ता सुरक्षेसाठी 'स्ट्रीट लॅब' उपक्रमातून स्वामी विवेकानंद रोड, नेपियन्सी रोड, विक्रोळी पार्कसाइट मार्ग क्रमांक १७, मौलाना शौकत अली रोड आणि राजाराम मोहन रॉय रोड या पाच रस्त्यांची सुधारणा करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. याच उपक्रमाच्या पुढच्या टप्प्यात मुंबईतील प्रत्येक विभागात दर्जेदार रस्ते देण्यासाठी रस्ते सुधारणा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व २४ विभागांमधील प्रत्येकी दोन रस्त्यांची निवड केली जाणार असून, तीन किमीपर्यंतच्या मार्गाची दुरुस्ती, सुधारणा आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. ५० रस्त्यांचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली.

'स्ट्रीट लॅब' उपक्रमाच्या माध्यमातून पालिकेने नगररचनाकारांकडून वाहतूक व्यवस्थेसाठी आराखडे मागवले होते. यातील विजेत्या आराखड्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते बनवण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने ५० रस्त्यांच्या कामासाठी निविदा मागवून तातडीने काम केले जाणार आहे. रस्त्यांच्या जंक्शन ठिकाणांच्या सौंदर्यीकरणाचे कामही केले जाणार आहे.


मुंबईतील वाहतूकव्यवस्था आणि सुरक्षेसाठी पोलिस, वाहतूक विभाग आणि पालिकेच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पुढील तीन महिन्यांच्या काळात पालिका, पोलिस, वाहतूक विभागाच्या माध्यमातून आणखी पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. त्यामुळे सुरक्षेबरोबरच रस्त्यांलगत कचरा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासही मदत होईल.

Web Title:  changing faces of fifty roads in mumbai

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com