पुण्यात चार नवे चेहरे भाजपकडून रिंगणात

 पुण्यात चार नवे चेहरे भाजपकडून रिंगणात

पुणे - भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे तीन आमदारांना उमेदवारी नाकारली असून, नवीन चार चेहऱ्यांना प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी संधी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे नवे चेहरे पुण्यातून प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 

आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर आणि भीमराव तापकीर हे आपला गड राखण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपचे बहुतेक उमेदवार येत्या तीन आणि चार तारखेला (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपला शत-प्रतिशत यश देणाऱ्या पुण्यात काही मतदारसंघांत बदल केला जाणार याची चर्चा होती. आज भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पुण्यातील आठही जागांचे उमेदवार जाहीर केले.  शिवसेनेने एखाद दुसरी जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव तंत्राचा प्रयत्न केला. पण अखेर भाजपने त्यांना ठेंगाच दाखविला. 
भाजपने कोथरूड मतदारसंघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उतरवले आहे. कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांना संधी दिली. पर्वतीतून माधुरी मिसाळ, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक, हडपसरमधून योगेश टिळेकर आणि खडकवासल्यातून भीमराव तापकीर यांना त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात यश आले आहे. कॅंटोन्मेंटमधून माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या ऐवजी त्यांचे बंधू व स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी मिळाली. 

विजय काळे यांचा पत्ता कट 
भाजपच्या आठपैकी चार आमदारांनी उमेदवारी कायम ठेवली. तीन ठिकाणचे उमेदवार बदलले आहेत. गिरीश बापट हे खासदार झाल्याने कसब्यात बदल अपेक्षित होता. तेथे महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांनी एंट्री केल्याने मेधा कुलकर्णी यांना शांत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पण पक्षांतर्गत विरोध आणि पक्षश्रेष्ठींच्या नाराजीचा फटका शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांना बसला. माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र नगरसेवक सिद्धार्थ यांना तेथे उमेदवारी दिली आहे.

शहरातील आठही मतदारसंघांतील उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. काही उमेदवार गुरुवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज भरतील.
- माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष, भाजप

कोथरूड झाले हायप्रोफाइल 
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे हा मतदरासंघ ‘हायप्रोफाइल’ झाला आहे. भाजपने १२५ जणांची यादी जाहीर करताना, त्यात पहिले नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-उत्तर या मतदारसंघाचे आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोथरूड आहे. त्यानंतर मतदारसंघ क्रमांकानुसार उमेदवारांची नावे आहेत. 


Web Title: BJP has given the opportunity for the first time in elections four new faces
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com