मुंबई महापालिकेच्याही सीबीएसई व आयसीएसई शाळा सुरू होणार 

मुंबई महापालिकेच्याही सीबीएसई व आयसीएसई शाळा सुरू होणार 

मुंबई : इंग्रजी माध्यमांच्या शाळांबरोबरच दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई व आयसीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा प्रायोगिक तत्त्वावर आगामी शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्यात येणार आहेत. या शाळांमधील शिक्षण विनामूल्य असणार आहे; परंतु या निर्णयावर "शिक्षक भारती' संघटनेने तीव्र ताशेरे ओढले आहेत. 

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी पालिकेकडून अनेक प्रयत्न करण्यात येतात. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे असल्याने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. ती रोखण्याठी मुंबई महापालिकेने मुंबई पब्लिक स्कूलच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या. त्यालाही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

परंतु, सध्या अनेक पालकांचा कल हा सीबीएस व आयसीएसई शाळांकडे असल्याने खिशाला परवडत नसतानाही पालक विद्यार्थ्यांना केंद्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई व आयसीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

त्या संदर्भातील प्रस्तावाला मंगळवारी (ता.21) शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सीबीएसईची बोर्डाची शाळा पालिकेच्या अंधेरी पूर्वेकडील पूनमनगर मनपा शाळेमध्ये, तर आयसीएसई बोर्डाची शाळा माटुंगा पश्‍चिमेकडील वूलन मिल मनपा शाळेमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


दोन्ही बोर्डाच्या शाळा या सध्या प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येणार आहेत. त्यानुसार दोन्ही शाळांमध्ये ज्युनियर, सीनियर केजी पहिली ते सहावीचे वर्ग 2020-21 या शैक्षणिक वर्षात सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच या शाळेतील शिक्षकांना संबंधित बोर्डाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

अशी असेल प्रवेशप्रक्रिया... 
सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळांची प्रवेशप्रक्रिया राबवण्यासाठी वर्तमानपत्रातील जाहिरातींसह परिसरात फलक लावण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत. पालिकेच्या अन्य शाळांना देण्यात येणाऱ्या सुविधा केंद्रीय बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जातील. त्याचप्रमाणे केंद्रीय बोर्डाकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्काची तरतूद शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे. 

पालिकेला राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा नीट चालवता येत नाहीत. पालिकेच्या इंग्रजी शाळांना चांगला प्रतिसाद मिळत असताना तिथे इतर माध्यमातील अतिरिक्त ठरलेले शिक्षक शिकवत आहेत. शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. नुकत्याच राबविण्यात आलेल्या भरतीमध्ये इंग्रजी माध्यमासाठी शिक्षक मिळाले नाहीत. असे असताना या मंडळाच्या शाळांमध्ये कोणते शिक्षक नियुक्त करणार हा मोठा प्रश्‍न आहे. 
- जालिंदर सरोदे, प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती 


Web Title: BMC will started soon CBSE schools


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com