मुख्यमंत्री फडणवीस आज अर्ज भरणार

मुख्यमंत्री फडणवीस आज अर्ज भरणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील भाजपचे सहाही उमेदवारांचे नामांकन भरण्यासाठी भाजपचे उमेदवार आज, शुक्रवारी संघभूमीत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. भाजपचे निवडणूक प्रमुख भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सरोज पांडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांच्यासह बहुतांश पक्षाचे उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. या महाअर्जभरतीसाठी पोलिस व प्रशासन सज्ज झाले आहे.


काँग्रेसच्या उमेदवारांनीही आज, शुक्रवारी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. शहर अध्यक्ष विकास ठाकरे व गिरीश पांडव यांनी अनुक्रमे पश्चिम व दक्षिण नागपुरातून गुरुवारी अर्ज दाखल केले. उत्तर नागपुरातून नितीन राऊत, मध्य नागपुरातून बंटी शेळके आणि पूर्व नागपुरातून पुरुषोत्तम हजारे यांनी आपआपल्या मतदारसंघातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन रॅलीची तयारी केली आहे. काँग्रेसचे सर्व उमेदवार सकाळी १० वाजता संविधान चौकात येतील. भाजपच्या रॅलीनंतर त्यांची रॅली निघणार आहे.

दक्षिण-पश्चिम नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पश्चिम नागपूर- सुधाकर देशमुख, पूर्व नागपूर- कृष्णा खोपडे, मध्य नागपूर- विकास कुंभारे, दक्षिण- मोहन मते आणि उत्तर नागपुरातून डॉ. मिलिंद माने अर्ज दाखल करणार आहेत. सर्व उमेदवार आपापल्या मतदारसंघातून सकाळी ९ वाजता संविधान चौकात पोहोचतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर रॅलीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. शहरातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, नगरसेवक, मंडळ व बुथ पातळीवरील पदाधिकारी, मोर्चाचे प्रमुख आणि मतदारसंघातील कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत. नामांकन दाखल करणे व शक्तिप्रदर्शनासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी एका बैठकीत उमेदवार व पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानुसार बुधवारी सायंकाळपासून तयारी करण्यात आली.

बहुजन समाज पक्षाने यादी जाहीर केलेली नाही. त्यांच्या उमेदवारांना ऐनवेळी बी फॉर्म देण्यात येणार असल्याचे समजते. वंचित बहुजन आघाडी, विदर्भ निर्माण महामंच आणि अन्य इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे.

भाजपच्या तिसऱ्या यादीतही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव नसले तरी, कामठी मतदारसंघातून आज, शुक्रवारी नामांकन दाखल करण्याची पूर्ण तयारी केली आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांना तसे आवाहनही करण्यात आले आहे.

काँग्रेसला रात्री उशिरापर्यंत दक्षिण-पश्चिम नागपूरचा उमेदवार निश्चित करता आला नाही. घोळ कायम असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध कोण राहील, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे. वंचित बहुजन आघाडीने शहराध्यक्ष रवी शेंडे यांची उमेदवारी जाहीर केली. ते आज अर्ज भरणार आहेत. बसपनेही उमेदवार गुलदस्त्यात ठेवला आहे.


सर्व २८८ जागा लढ‌णाऱ्या बहुजन समाज पक्षाने अखेरपर्यंत यादी गुलदस्त्यात ठेवली. उत्तर नागपुरातून प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांची घोषणा करण्यात आली आहे. बसपचे सर्व उमेदवार सकाळी ११ वाजता संविधान चौकातून रॅलीद्वारे अर्ज भरण्यास जातील.


 
Webtittle:CM Devendra Fadnavis assembly election maharashtra 2019|Assembly election

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com