चीनमधील कोरोना महाराष्ट्रात कसा पसरला, ते जाणून घ्या

चीनमधील कोरोना महाराष्ट्रात कसा पसरला, ते जाणून घ्या

मुंबई- जगभरात सध्या कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय. गुढीवाडवा अर्थात मराठी नववर्ष उंबरठ्यावर असताना कोरोनासारखा जीवघेणा आजार महाराष्ट्रात बळावतोय. चीन, इटली, इराण, अमेरिका, यूकेनंतर कोरोनानं भारतात शिरकाव केला आहे.

खरंतर कोरोना भारतात आला तो सुरुवातीला केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये. गेल्या काही दिवसापर्यंत महाराष्ट्रात तर कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. पण सध्याचं चित्र काही वेगळच आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढली की सध्या देशात महाराष्ट्रात सर्वांत जास्त रुग्ण आहेत.

अचानक महाराष्ट्रात रुग्ण कसे काय वाढले?


अचानक राज्यात कोरोनाच्या चाचण्या होऊ लागल्या आणि रुग्णांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह येऊ लागलs. यामुळे लोकांमधे भीतीदेखील पसरत गेली.  तसंच हजारोंच्या संख्येनं राज्यातील नागरिकांना क्वारंटाईन करावं लागलं. राज्यात आतापर्यंत 39 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. तर 128 जण विलगिकरण कक्षात दाखल असून 1063 जणांना होम क्वारंटाईन केलं आहे.

परदेशवारी करुन आलेल्यांना कोरोना झाला?


राज्यात कोरोनाची सुरुवात दुबईहून आलेल्या रुग्णांपासून झाली. त्यानंतर अमेरीका, थायलंड अशा परदेशाहून महाराष्ट्रात परतलेल्या नागरिकांच्या कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे हे रुग्ण ज्यांच्या संपर्कात आले, त्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचं समोर येऊ लागलं. कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्यांमध्ये कोरोना व्हायरस आढळला आणि महाराष्ट्रात संख्या वाढू लागली. नुकतंच मुंबईत 2 फिलीपीन्सच्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची तपासणी केली जाते आहे. काही दिवसांपूर्वी ते मुंबईत कामानिमित्त आले होते. 

रुग्ण वाढल्यानंतर खबरदारीही वाढली


भारतात कोरोनाचे रुग्ण आढळत असले तरी कोरोना व्हायरसची मूळ लागण ही परदेशाहून आल्यानंतर किंवा अशा व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर होत असल्याचा दावा केला जातोय. जो काही अंशी खरादेखील आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील तपासणी ज्या तत्परतेने करायला हवी होती तशी झाली नसल्याचा आरोप करण्यात येतो आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढल्यानंतर राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वच विमानतळांवर खबरदारी घेतली जात आहे. 

कोरोनाची राज्यात एन्ट्री

महाराष्टात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला 10 मार्च रोजी. पुण्यात दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांच्यावर तातडीने पुण्यातीलच नायडू रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. कोरोना व्हायरस आता राज्यभर पसरणार याची शक्यता या रुग्णांच्या चौकशीतून समोर आली. आणि लोकांमध्ये आणखीन भीती पसरली. त्यानंतर पुण्यातील लोकं शहर सोडून गावची वाट धरु लागल्याचंही चित्र दिसून आलं. 

पुण्याचे विभागीय आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, "महाराष्ट्रात सर्वप्रथम आढळलेले पुण्याचे 2 रुग्ण हे दुबईहून आले होते. 40 जणांच्या समूहासोबत हे दोघे दुबईला फिरण्यासाठी गेले होते. महत्त्वाचं म्हणजे या 40 पैकी 37 जण हे महाराष्ट्रातले नागरिक आहेत, तर 3 जण कर्नाटकातले. 1 मार्चला हे 37 जण मुंबई विमानतळावर उतरले. पुण्यातील दोघं मुंबईहून खासगी टॅक्सीने पुण्यात आले. 8 मार्चला या दोघांपैकी एकाला अचानक त्रास होऊ लागला. त्यानंतर कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली, ज्यात दोघं कोरोनाग्रस्त असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या दोघांचे कुटुंबीय आणि मुंबईतला टॅक्सीचालक अशा सगळ्यांनाच कोरोनाची लागण झाली." .

हेही पहा- कोरोनाबद्दलची तुमची प्रत्येक शंका हा व्हिडीओ दूर करेल!

कोरोना व्हाया दुबई 


महाराष्ट्रात व्हाया दुबई आलेल्या या कोरोना व्हायरसचा तिढा फक्त सांस्कृतिक शहारपुरताच उरला नाही. तर तो राज्यभर पसरला.  तर दुबईहून आलेले उर्वरित 35 जण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील असल्यानं अशा सगळ्यांचा शोध प्रशासनाकडून घेण्यात आला. या सगळ्या जणांचा शोध घेणं प्रशासनासमोर मोठं आव्हान होतं. 

10 मार्च ते 16 मार्च या सात दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली. ही संख्या आता 39 वर पोहोचली आहे. मात्र हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. आता कोरोनाला रोखण्यासाठी जगजागृती केली जाते आहे. गर्दी न करणं, स्वच्छता राखणं, यासांरखे अनेक उपाय योजले जात आहेत. मात्र या उपायांनंतरही कोरोनाला रोखण्याच यश कधी येतं, हा प्रश्न सध्या प्रत्येकालाच अस्वस्थ करतो आहे. 

WEB TITLE- Corona spread in Maharashtra


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com