आज सिंहगड एक्‍स्प्रेस डेक्कन क्वीन रद्द

आज सिंहगड एक्‍स्प्रेस डेक्कन क्वीन रद्द

पुणे - मुंबईतील मुसळधार पावसामुळे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बहुतेक रेल्वेगाड्या बुधवारी रद्द झाल्या. तसेच, गुरुवारीही (ता. ५) डेक्कन एक्‍स्प्रेस, सिंहगड एक्‍स्प्रेस, प्रगती एक्‍स्प्रेस, इंटरसिटी एक्‍स्प्रेस आणि डेक्कन क्वीन या गाड्या (ता. ५) रद्द होणार आहेत, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे. 

मुंबईतील मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक होऊ शकली नाही. दूर पल्ल्याच्या गाड्यांनाही त्याचा फटका बसला. काही गाड्या पुण्यापर्यंतच बुधवारी सोडण्यात आल्या, तर गुरुवारीही त्या पुण्यापर्यंतच धावणार आहेत. कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍स्प्रेस बुधवारी पुण्यापर्यंतच धावली. तसेच मुंबई-कोल्हापूर एक्‍स्प्रेसही पुण्यापर्यंतच धावली. पुणे-इंदूर  आणि जयपूर-पुणे या दोन्ही गाड्या शनिवारी (ता. ७) रद्द करण्यात आल्या आहेत.

एसटी सेवा विस्कळित
मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी पुणे-मुंबई दरम्यान एसटी सेवा विस्कळित झाली. परिणामी, पुण्याहून मुंबई, दादरकडे जाणाऱ्या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. सकाळी ११ ते २ पर्यंत या मार्गावरील वाहतूक विस्कळित होती. त्यामुळे मुंबईकडून येणाऱ्या एसटी बसही पुण्यात पोचू शकल्या नाहीत. दरम्यान, दुपारनंतर पुणे-मुंबई एसटी सेवा पूर्ववत झाल्याचे स्वारगेट आगार व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी सांगितले.

या गाड्या झाल्या बुधवारी रद्द 
पुणे-मुंबई इंद्रायणी एक्‍स्प्रेस, कोनार्क एक्‍स्प्रेस, मुंबई-पुणे सिंहगड एक्‍स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, मुंबई-पुणे प्रगती एक्‍स्प्रेस, पुणे- मुंबई इंटरसिटी एक्‍स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्‍स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्‍स्प्रेस, पुणे-इंदूर एक्‍स्प्रेस, पुणे-अहमदाबाद एक्‍स्प्रेस, मुंबई-सोलापूर सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेस. 

या गाड्या आज रद्द
मुंबई-पुणे इंद्रायणी एक्‍स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्‍स्प्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्‍स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, पुणे-मुंबई प्रगती एक्‍स्प्रेस, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्‍स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्‍स्प्रेस.

Web Title: Deccan Queen with Sinhagad Express canceled today

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com