पुण्यात डेंग्यू वाढतोय... 

पुण्यात डेंग्यू वाढतोय... 


पुणे -  पुण्यात पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. डेंगीचा संशय असलेले पाच जण मृत्युमुखी पडले असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू हा सप्टेंबरमधीलच आहे. डेंगीचे निश्‍चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या शेकड्यात असली, तरीही संशयित रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडण्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत डेंगीच्या तीन हजार ४९० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी जून ते सप्टेंबर या कालावधीत तीन हजार २८१ डेंगीचे संशयित रुग्ण  आढळले आहेत.  

का वाढला डेंगी?
गृहनिर्माण सोसायट्या, खासगी आस्थापना, सरकारी कार्यालये अशा ठिकाणी पावसाच्या साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होते. फुटलेल्या काचा, टायर, भंगार साहित्य अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यावर एडिस इजिप्ती डासांचा फैलाव होतो. त्यातून  डेंगी होतो. 

डेंगीबरोबर चिकुनगुनियाही वाढला
शहरात डासांपासून फैलावणाऱ्या डेंगीबरोबरच चिकुनगुनियादेखील वाढत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदविले आहे. जुलैमध्ये चिकुनगुनियाचे जेमतेम १४ रुग्ण होते. ते ऑगस्टमध्ये ४४ झाले; तर सप्टेंबरमध्ये त्यात सुमारे चौपट वाढ होऊन १६४ रुग्णांची नोंद आरोग्य खात्यात झाली. 

पुढे काय होणार?
सध्या पाऊस थांबला आहे. उन्हाचा चटका वाढत आहे. असे वातावरण हे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक असते. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये डेंगीचा उद्रेक वाढण्याची शक्‍यता सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वर्तविण्यात येत आहे.

नोटिसा आणि प्रशासकीय शुल्क
डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, मालमत्ता, बांधकामांची ठिकाणे अशा वेगवेगळ्या एक हजार ८६१ आस्थापनांना महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नोटीस बजाविण्यात आली आहे. ही नोटीस म्हणजे तातडीने डासोत्पत्तीची ठिकाणे मालकांनी नष्ट करून स्वच्छ करणे आवश्‍यक असते. ही नोटीस बजावूनही दुर्लक्ष केल्यास या मालकांकडून दंड वसूल करते. गेल्या नऊ महिन्यांमध्ये दोन लाख ६७ हजार रुपयांचे प्रशासकीय शुल्क वसूल करण्यात आले आहे.

पाऊस खूप लांबल्याने आणि ऑक्‍टोबर हीट असल्याने डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण आहे. हे गृहीत धरून महापालिकेने डासोत्पत्तीची स्थळे नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. हे युद्धपातळीवर काम सुरू आहे.
- डॉ. संजीव वावरे,  सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका 

पाऊस, गारठा आणि आता उन्हाचा चटका, असे बदलणारे वातावरण पुणेकरांनी चार दिवसांमध्ये अनुभवले. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. ताप, सर्दी, खोकला त्याचबरोबर विषाणुजन्य आजारांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचेही दिसते.
- डॉ. सचिन गांधी


Web Title: Dengue is on the rise in Pune
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com