एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ

एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ

पुणे : ज्येष्ठ नागरीक, विद्यार्थी तसेच विविध सवलती मिळणाºया लाभार्थ्यांना एसटी महामंडळाकडून दिलासा देण्यात आहे. दि. १ जानेवारीपासून त्यांना स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याची घोषणा महामंडळाने केली होती. पण अद्याप अनेक लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड न मिळाल्याने त्याला दि. १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली अहे. विद्यार्थ्यांसाठी ही मुदत दि. १ जून ही असेल. 

‘एसटी’कडून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग, विविध पुरस्कारार्थी यांसह विविध घटकांना बस प्रवासासाठी तिकीट दरात सवलत दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांना वयाचा पुरावा दाखविल्यानंतर ही सवलत मिळते. तर विद्यार्थ्यांना ठराविक कालावधीचा पास दिला जातो. महामंडळाच्यावतीने विविध घटकांसाठी १ जून २०१९ पासून स्मार्टकार्ड योजना सुरू करण्यात आली असून सद्यस्थितीत ३० लाख ९७ हजार ७२६ जणांची नोंद झाली आहे. दि. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत स्मार्टकार्ड मिळविणे आवश्यक होते. त्यानुसार दि. १ जानेवारीपासून स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही, असे प्रशासनाने जाहीर केले होते. पण नोंदणीला मिळालेला प्रतिसाद पाहता ही मुदत वाढून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांनी केली होती. त्यास परिवहन मंत्री सुभाष देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दि. १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.  ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या कोणत्याही आगारामध्ये स्मार्ट कार्ड मिळू शकते. एकाच आगारामध्ये गर्दी होत असल्याने यंत्रणेवरही ताण पडत आहे. त्यामुळे त्यांनी जवळच्या आगारामध्ये त्यासाठी नावनोंदणी करावी. असे आवाहन एसटी अधिकाºयांनी केले आहे. तर विद्यार्थी वगळून अपंग, पुरस्कारार्थी व इतरांना एसटीच्या पुणे विभागाच्या शंकरशेठ रस्त्यावरील मध्यवर्ती कार्यालयामध्ये नावनोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित आगारामधून स्मार्ट कार्ड मिळेल, असे अधिकाºयांनी सांगितले.

स्मार्ट कार्ड काढण्यासाठी विविध आगारांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण अनेक ज्येष्ठ नागरिक स्वारगेट आगारातच गर्दी करत आहेत. त्यामुळे त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.स्मार्ट कार्डसाठी लांबलचक रांगेत थांबावे लागत आहे. नावनोंदणीसाठीचे सर्व्हर धीम्यागतीने चालत असल्याने एकाला किमान १० मिनिटांचा वेळ लागत आहे. काही नागरिकांकडे मोबाईल नसल्याने ओटीपीसाठी अन्य लोकांचा मोबाईल शोधावा लागतो. काही आगारांमध्ये टोकन घेऊन मग नंतर रांगेत उभे राहावे लागते. स्मार्ट कार्ड मिळेपर्यंत किमान दोन-तीन हेलपाटे होतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एकप्रकारचा जाच आहे. त्यामुळे स्मार्ट कार्डचे बंधन ज्येष्ठ नागरिकांना नको, अशी मागणी शशिकांत इनामदार, कुमार कुलकर्णी, चंद्रकांत जोशी, अनिल कुलकर्णी व अनिल निरगुडकर या ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, मासिक, त्रैमासिक पासधारकांना दि. १५ फेब्रुवारी पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी १ जुन २०२० पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे. दिव्यांगांसाठी अद्याप स्मार्टकार्ड योजना लागु करण्यात आली नाही. त्यामुळे दिव्यांगांसाठी सध्याचीच कार्यपद्धती लागु राहील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरीक, विद्यार्थी, दिव्यांग तसेच इतर लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

Web Title: limit increasing on 1April for ST's smart card

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com