मध्यप्रदेशात सुऱू असलेल्या पावसामुळे गडचिरोलीत पूर 

मध्यप्रदेशात सुऱू असलेल्या पावसामुळे गडचिरोलीत पूर 

गडचिरोली - मध्य प्रदेशात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे तब्बल 36 दरवाजे मंगळवारी (ता. 10) उघडण्यात आल्याने गडचिरोली जिल्ह्यात सर्वदूर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने जिल्हा मुख्यालयासह शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हीच परिस्थिती असल्याने सामान्यांमध्ये प्रशासनाप्रती रोष व्यक्‍त होत आहे.

पूर्व विदर्भात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतु मध्य प्रदेशात मात्र पावसाचा वाढता जोर आणि संततधार सुरूच आहे. पूर्व विदर्भातील अनेक प्रकल्पाचे साठवणक्षेत्र या भागात आहेत, त्यामुळे पाऊस नसताना देखील पूर्व विदर्भातील अनेक प्रकल्पांच्या पातळीत वाढ नोंदविली गेली आहे. यातील काही प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने प्रशासनाची चिंता वाढीस लागली आहे.

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाची पातळी देखील वाढल्याने खबरदारीच्या उपायांतर्गत या प्रकल्पाचे 36 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सोमवारी (ता. 9) या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी (ता. 10) पहाटे देखील प्रकल्पातून पुन्हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा, पाल, तठाणी बरोबरच अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने सर्वच रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोलीवासीयांचा इतर शहरांशी संपर्क तुटला आहे.


Web Title: Flood in Gadchiroli by Madhyapradesh Water
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com