राज्यात पुन्हा पावसाची दमदार हजेरी 

राज्यात पुन्हा पावसाची दमदार हजेरी 

पुणे - कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. गुरुवारी (ता. १९) कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर खानदेशातील पाचोरा, भडगाव, धरणगाव, जळगाव, जामनेर, पारोळा, एरंडोल, धुळ्यातील सिंदखेडा, साक्री, धुळे येथे हलका पाऊस पडला. औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव, ढोरकीन, जालन्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसर विदर्भातील जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगांची दाटी होत आहे. यामुळे सकाळपासून काही भागात पावसास सुरवात होत आहे. दुपारी काही प्रमाणात विश्रांती घेत असला तरी, अधूनमधून पुन्हा पावसास सुरवात होत आहे. गुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत कोकणातील हर्णे येथे ९०.८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. आज दिवसभर कोकणातील बहुतांशी भागात सरी कोसळत होत्या.

घाटमाथ्यावरही पावसाचा चांगलाच जोर होता. यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्याच्या पूर्व भागात अधूनमधून सरी बरसत होत्या. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाड्यातही हवामान अंशतः ढगाळ असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत होत्या. विदर्भातील पूर्व पट्ट्यातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही सरी कोसळत होत्या. पश्चिम पट्ट्यातील बुलडाणा, अमरावती, वाशीम या जिल्ह्यांत हवामान ढगाळ आहे.

इचलकरंजीस झोडपले
इचलकरंजी - शहर परिसरात गुरुवारी सायंकाळी पावसाने प्रचंड झोडपले. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. आज सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते दुपारी ही काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली सायंकाळी मात्र सुरू झालेल्या पावसाने तब्बल एक तासाहून अधिक काळ शहराला झोडपले. यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले. काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. पावसामुळे शालेय मुलांची मोठी गैरसोय झाली. गुडघ्यावर पाण्यातून मुलांना रस्ता पार करावा लागत होता.

साताऱ्यातील दुष्काळी भागात दमदार
सातारा - माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना बुधवारी दमदार पाऊस झाला आहे. या पावसाने टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, पश्चिम भागातील पिकांना या पावसाने धोका निर्माण होणार आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १८.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर व जनावरांच्या चाऱ्यासाठी छावणीवर अवलंबून असणाऱ्या माण तालुक्‍यासह खटाव, फलटण तालुक्‍यांत झालेल्या दमदार पावसाने दिलासा दिला. तर साताऱ्यासह कोरेगाव तालुक्‍यातही काही ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली. माणच्या पश्‍चिमेकडील बोथे येथे सुद्धा पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी साधारण अर्धा तास, तर काही ठिकाणी तासभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

उस्मानाबादेत पहिल्यांदाच जोरदार सरी
औरंगाबाद - मराठवाड्यातील उस्मानाबादमध्ये गुरुवारी पहिल्यांदाच पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जालना, बीड जिल्ह्यात रिमझिम ते तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. औरंगाबाद शहरात दुपारी साडेबाराच्या सुमारास सुमारे पंधरा मिनिटे आलेली पावसाची जोरदार सर रस्ते जलमय करुन गेली. मराठवाड्यात सुरवातीपासून ताण देणारा पाऊस सरतेवेळी का होईना, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सक्रिय झाला आहे. काल मराठवाड्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला.  जिल्ह्यातील सोयगाव तालुक्‍यात मुसळधार पावसाने बहुला नदीसह नाल्यांना पूर आला.  

जालना जिल्ह्यात आजही ठिकठिकाणी रिमझिम पाऊस झाला. भोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव रेणुकाई, बदनापूर तालुक्‍यातील दाभाडी आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. परभणीतही तुरळक पाऊस झाला.

वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत हजेरी
अकोला - वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांत आज पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्‍यात २१.६, तेल्हारा २७.६ आणि बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्‍यात १५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यातील घुंगशी बॅरेज, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा, पलढग व मस या मध्यम प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे.


Web Title: Heavy Rain in Maharashtra Water

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com