हिमाचल सफरचंदाची हंगाम अंतिम टप्प्यात 

हिमाचल सफरचंदाची हंगाम अंतिम टप्प्यात 

मार्केट यार्ड - काश्‍मीर येथील कलम ३७० हटविल्यानंतर फुटीरवादी संतप्त झाले होते, त्यामुळे यंदा काश्‍मीरचे सफरचंद पुणेकरांना मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून लष्कराच्या सुरक्षेत काश्‍मिरातून सफरचंद पाठविण्यास सुरवात झाली आहे. 

देशासह पुण्याच्या बाजारातही येथील सफरचंद दाखल होत आहेत. किरकोळ बाजारात दर्जानुसार प्रतिकिलो ७० ते १०० रुपये भाव आहे, अशी माहिती सफरचंदाचे व्यापारी सुयोग झेंडे यांनी दिली.

मागील आठ ते दहा दिवसांपासून मार्केट यार्डात दररोज सफरचंदाच्या २ ते ३ गाड्यांची आवक होत आहे. काश्‍मीर येथील दोडा, सोपियान या भागांतून ही आवक होत आहे. घाऊक बाजारात सफरचंदाच्या १५ किलोच्या पेटीस ७०० ते १००० रुपये भाव मिळत आहे. 

हिमाचल सफरचंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने काश्‍मिरी सफरचंदांना उठाव आला आहे. ऑगस्ट महिन्यापासून हिमाचल प्रदेशातून सफरचंदाची आवक सुरू होती. सध्या तेथून पुणे बाजारात आवक कमी होत चालली आहे, त्यामुळे काश्‍मिरी सफरचंदाला उठाव आला आहे. सध्या काश्‍मिरी सफरचंदाची आवक कमी प्रमाणात असली तरी पुढील आठ ते दहा दिवसांत येथील परिस्थिती निवळल्यानंतर आवक वाढेल, असा अंदाज झेंडे यांनी व्यक्त केला.

Web Title:Himachal apple season finale


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com