मातृभाषेनंतरची दुसरी भाषा म्हणून हिंदी शिकली जावी - अमित शहा

मातृभाषेनंतरची दुसरी भाषा म्हणून हिंदी शिकली जावी - अमित शहा

नवी दिल्ली - 'एक देश एक भाषा'ची कल्पना मांडून हिंदीचा जोरदार पुरस्कार करणारे गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदीबाबतच्या वक्तव्यानंतर दक्षिण भारतातून संतप्त प्रतिक्रियांची धग वाढताच आज तातडीने खुलासा करून "प्रांतीय भाषांवर हिंदी लादण्यात यावी, असे मी कधीही म्हटले नव्हते. केवळ मातृभाषेनंतरची द्वितीय भाषा म्हणून हिंदी शिकली जावी, एवढेच मी म्हटले होते,' असे सांगितले.

आपण बोललेल्या एखाद्या मुद्द्यावर जेमतेम 48 तासांत असा खुलासा करण्याची वेळ शहांवर प्रथमच आल्याचे मानले जाते. वाद इतका वाढला, की "मी स्वतः गैर हिंदीभाषक गुजरातमधून आलो आहे,' असा दाखला देण्याची वेळ त्यांच्यावर आली. हिंदीच्या मुद्द्यावर माझे म्हणणे नीट समजून न घेता ज्यांना फक्त राजकारणाच्या पोळ्या भाजून घ्यायच्या, त्यांनी त्या खुशाल भाजाव्यात, अशीही संतप्त भावना शहांनी व्यक्त केली आहे. हिंदीबाबतच्या मुद्द्यावर त्यांनी आज "एएनआय' वृत्तसंस्थेच्या माध्यमातून ट्‌विट करून खुलासा केला आहे.

"हिंदी दिना'च्या कार्यक्रमात बोलताना, अनेक भाषा व अनेक बोली या देशाची ताकद असली; तरी विदेशी भाषांच्या वर्चस्वाचा मुकाबला करण्यासाठी देशाची एकच भाषा असावी, यादृष्टीने हिंदी ही राज्यभाषेच्या रूपात स्वीकारली गेली. देशाला आता एका भाषेची जरुरी आहे, ज्यायोगे विदेशी भाषांना स्थान मिळणार नाही, असे शहा म्हणाले होते. मात्र, त्यांच्या त्या विधानानंतर दक्षिणेकडे विशेषतः तमिळनाडूत विरोध सुरू झाला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हिंदी लादण्याच्या मुद्द्याला तीव्र विरोध केला. खुद्द भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनीही शहा यांच्या हिंदीबाबतच्या विधानाशी असहमती दर्शविली.


Web Title: Hindi will not be imposed on the regional languages Amit Shah

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com