पुण्यात शिवसेनेला किती जागा?

 पुण्यात शिवसेनेला किती जागा?

पुणे : भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपात पुण्यात शिवसेनेला किमान दोन जागा मिळाव्यात, यासाठी शहरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून, त्यांनी तशी आग्रही मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हडपसर, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या जागांवर त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे, पुण्यात भाजपच्या दोन आमदारांना युतीसाठी त्याग करावा लागणार आहे. 

शिवसेनेच्या नेत्यांनी सर्व जिल्ह्यातील प्रमुखांकडून त्यांच्या परिसरातील राजकीय सद्यस्थितीची माहिती गेल्या शुक्रवारी घेतली. त्यावेळी, पुणे शहरातील नवीन नियुक्त झालेले शहरप्रमुख संजय मोरे यांनी पुणे शहरातील शिवसैनिकांची मागणी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. युती 1995 मध्ये सत्तेवर आली, तेव्हा पुण्यात सहापैकी तीन आमदार शिवसेनेचे होते. दोन्ही पक्षांना लढण्यासाठी प्रत्येकी तीन जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपचे दोन आमदार होते. त्यामुळे, पुण्यात आठ जागांपैकी दोन्ही पक्षांना प्रत्येकी चार जागा मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. 

शिवसेना 2014 च्या निवडणुकीत पराभूत झाली असली, तरी चार जागांवर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. यावेळी हडपसरमध्ये महादेव बाबर, नाना भानगिरे इच्छुक आहेत. त्या भागात शिवसेनेची ताकद असल्यामुळे, त्या जागेसाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. शिवाजीनगरमध्ये माजी आमदार विनायक निम्हण इच्छुक आहेत. या जागेसाठी माजी सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे हेही 'मातोश्री'वर जाऊन ठाकरे यांना भेटले आहेत. 

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ जागा वाटपात मिळाल्यास, अविनाश साळवे यांना संधी मिळू शकते. कोथरूड मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, तर खडकवासला मतदारसंघात रमेश कोंडे यांनी शिवसेनेकडून लढण्याची तयारी दाखविली आहे. पुणे शहरात युतीच्या जागा वाटपात किमान एक तरी जागा शिवसेनेला सोडावी लागणार आहे. त्यामुळे, कोणत्या आमदाराचा बळी द्यावयाचा, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना करावा लागेल. सर्व आठही जागा भाजपकडे ठेवल्यास, प्रचारात शिवसैनिकांचे सहकार्य मिळविणे त्यांना अवघड जाईल. 
 

Web Title:How much space for Shiv Sena in Pune?


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com