भाजपाला हरवल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही: शरद पवार

भाजपाला हरवल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही: शरद पवार

अकोला: अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात वाडेगावात राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम गावंडे, मूर्तिजापुरात रविकुमार राठी तर वाशीम जिल्ह्यातील मानोरा येथे कारंजा मतदारसंघातील प्रकाश डहाके यांच्या प्रचारार्थ सोमवारी पवार यांनी सभा घेतल्या. वाडेगावातील सभेत पवार म्हणाले, ‘सर्व क्षेत्रांत अपयशी ठरलेल्या या सरकारने चक्क सैनिकांनाही सोडले नाही. त्यांच्या शौर्याचा वापरसुद्धा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी करणारे हे सरकार नागरिकांबाबत किती गंभीर आहे, हे यामधून दिसून येते. इंदिरा गांधींच्या काळातही युद्ध झाले होते. त्यांनी तर पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिंकूनदेखील त्याचे श्रेय घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.’ नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी हे मुद्देसुद्धा सर्वसामान्यांची फसवणूक करणारे निघाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
‘सामान्यांची फसवणूक करून दिलेला शब्द न पाळणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही. मला या वयातही प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याबद्दलचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे; पण त्यांना ठणकावून सांगतो की, मी अजूनही तरुण आहे. म्हातारा तर मुळीच नाही. या सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होण्याचा प्रश्नच नाही,’ असे रोखठोक उत्तर देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधले.

पवार म्हणाले, ‘शेतकऱ्यांवर प्रेम असल्याने कर्जमाफी केल्याचा नुसता देखावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. अजूनही राज्यातील ६१ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत न मिळाल्याने त्यांची परिस्थिती गंभीर आहे. यामध्ये तर एका कुटुंबाच्या घरी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अर्धे मंत्रिमंडळ भेट देऊन आले होते. त्यामुळे अशा अकार्यक्षम, संवेदनाहीन सरकारला खुर्चीवरून खाली खेचायला हवे.’


 Web Title I am still young: Sharad Pawar


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com