पुण्यात आज हलक्‍या सरी पडण्याची शक्यता

 पुण्यात आज हलक्‍या सरी पडण्याची शक्यता

पुणे - पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात रविवार (ता. ३) पासून मंगळवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील. या कालावधीत हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर, बुधवारी (ता. ६) मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्‍या स्वरूपाचा पाऊस होईल, अशी शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात जोरदार, तर कोकण- गोवा आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला. ‘क्‍यार’ चक्रीवादळ ओमानच्या किनाऱ्याकडे गेल्यानंतर तीव्रता कमी झाली आहे. राज्यात पूर्व- मध्य अरबी समुद्रावरील ‘महा’ चक्रीवादळ पुढील ४८ तासांत दक्षिण गुजरात किनारपट्टीकडे वळण्याची शक्‍यता आहे. पश्‍चिम- मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासांत सोमालिया किनारपट्टीकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे त्याची तीव्रता कमी होईल. पूर्व- मध्य अरबी समुद्रातील ‘महा’ चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर आहे. हे वादळ पश्‍चिमेकडे सरकत असून, त्याची तीव्रताही वाढत आहे. ते गुजरातच्या किनाऱ्याकडे येणार आहे. या काळात महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत समुद्र खवळलेला राहणार असून, किनारपट्टीलगत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल. राज्यात मंगळवारपर्यंत काही ठिकाणी हलक्‍या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

राज्यात पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. पाऊस पडत असलेल्या भागात दिवसाचे कमाल तापमान तीस अंशांच्या खाली आले आहे, तर पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका वाढला आहे. कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी तापमान तिशीच्या वर गेले आहे. शनिवारी (ता. २) सकाळी साडेआठपर्यंत डहाणू येथे सर्वाधिक २३.६, तर सर्वांत कमी तापमान महाबळेश्‍वर येथे १४.०९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

Web Title: Light rain in Pune today
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com