राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 67 लाख रुपयांची दारू जप्त

 राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 67 लाख रुपयांची दारू जप्त
goa news

गोवा राज्यात (Goa) निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे (Alcohol) 625 खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण 67 लाख 56 हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पूलाखाली मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. (Major action by the state excise department Alcohol worth Rs 67 lakh seized)

देशी-विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला असून राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार तसेच अंमलबजावणी व दक्षता संचालक श्रीमती उषा वर्मा, कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकाची गोवा राज्यातील अवैध मद्य विरुद्ध या महिन्यातील तिसरी मोठी कारवाई आहे. 

हे देखील पाहा

सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पूलाखालून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर मिळताच मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवून गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी  मद्याचे 635 खोके असलेला ट्रक पकडला. ब्लेंडर्स प्राईड (Blenders Pride), रॉयल चॅलेंजर्स, अरोबेला व्होडका, इम्पिरियल ब्लू व्हिस्की या ब्रॅंडच्या 750 मि.ली.वजनाच्या बाटल्यांचे 525  खोके तर बडवायझर (Budweiser) बियरचे अर्धा लीटर वजनाच्या टीनचे 100 खोके असे एकूण 625  खोके ट्रकसह भरारी पथकाने जप्त केले आहेत.

ट्रकसह या मद्याची एकूण किंमत 67 लाख 56 हजार 740 रुपये असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळवले आहे. गेल्या सहा दिवसांपूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पनवेल येथे गोवा राज्यातील अवैध मद्याचे 56 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 500 खोके तर 20 मे रोजी उस्मानाबाद येथेही 43 लाख 93 ह्जार रुपये किमतीचे अवैध मद्याचे 575 खोक्यांसह मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे.

Edited By : Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com