दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा हा निर्णय...

दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा हा निर्णय...

ठाणे : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा महाविकास आघाडीचा राज्यकारभार सुरू झाला आहे. त्यामुळे त्याचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थेतही उमटत आहेत. अशा वेळी ठाणे महापालिकेच्या परिवहन समिती (टीएमटी) निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या राजकीय कुरघोडीत भाजपची एक जागा कमी होऊ नये, यासाठी तब्बल आठ दिवस आधीच भाजपच्या गटनेत्यांनी आपल्या नगरसेवकांना व्हीप बजाविला आहे.

राजकीय संख्याबळानुसार समितीवर शिवसेनेचे सहा, राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचे दोन उमेदवार निवडून जाणे अपेक्षित आहे; पण शिवसेनेकडून सात उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत; तर पुरेसे संख्याबळ नसतानाही कॉंग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे.

अशा वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी त्यांचा एक जादा उमेदवार निवडून येण्यासाठी व्यूहरचना आखल्याचे कळते. त्याचा फटका भाजपच्या दोनपैकी एका सदस्याला बसण्याची शक्‍यता आहे. ही शक्‍यता टाळण्यासाठी एरव्ही कोणत्याही निवडणुकीच्या दोन दिवस आधी बजावण्यात येणारा व्हिप या वेळी तब्बल आठ दिवस आधीच भाजपच्या नगरसेवकांना बजावण्यात आला आहे. टीएमटीचे मतदान हे 5 मार्चला गुप्त पद्धतीने होणार आहे; तर अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवारी, 27 फेब्रुवारीला शेवटचा दिवस आहे. 

राज्यात अनपेक्षितपणे सत्तांतर झाल्याने सत्ता गमावलेल्या भाजपने स्थानिक राजकारणात नुकसान, दगाफटका टाळण्यासाठी सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशा वेळी गुप्त मतदानात आपल्या सदस्यांना फटका बसू नये, यासाठी व्हीप बजाविण्यात आला आहे. प्रत्येक नगरसेवकाला बारा जागांसाठी बारा मते देण्याची संधी आहे.

अशा वेळी शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने एकत्रित जादा सदस्य निवडून आणण्यासाठी व्यूहरचना आखली असल्यास एखाद-दुसरी चूकही भाजपच्या सदस्यासाठी धोक्‍याची ठरणार आहे. भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी नगरसेवकांना निवडणुकीच्या दिवशी कुठेही बाहेरगावी जाऊ नये, असेही बजाविले आहे. 

5 मार्चला निवडणूक
ठाणे परिवहन समितीमधील सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने 5 मार्चला निवडणुका घेण्याचे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. समितीमध्ये 12 सदस्य निवडून जाणार असले, तरी त्यासाठी 14 जणांनी अर्ज सादर केले आहेत. 

Web Title: BJP took steps to prevent tension

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com