कसे आहेत रोह्त पवारांचे लढवय्ये आजोबा? वाचा रोहित पवारांची फेसबुक पोस्ट

कसे आहेत रोह्त पवारांचे लढवय्ये  आजोबा? वाचा रोहित पवारांची फेसबुक पोस्ट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना देशभरातून शुभेच्छा देण्यात येत असताना त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून शुभेच्छा देताना आठवणींना उजाळा दिला आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बळीराजा कृतज्ञता दिन साजरा करण्यात येत आहे. मुंबईतील यशंवतराव चव्हाण सेंटर येथे ढोल, ताशे, लेझीमचा उत्साहात शरद पवारांचे स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार असून, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट :
अगदी सुरवातीच्या काळात म्हणजे शारदाबाईंच्या काळात घरात शेतकरी कामगार पक्षाच वातावरण. शेतकरी कामगार पक्ष म्हणल्यानंतर साहजिक घरातलं वातावरण हे शेतकरी कल्याणासाठी काम करण्याच. काही बाबतीत शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस यांच्यात वैचारिक फरक होता. मात्र आदरणीय साहेबांनी कॉंग्रेसचा मार्ग स्वीकारला. आजही वडिलधारी लोकं सांगतात की घरात पहिल्यापासूनच इतकं मोकळं वातावरण होतं की प्रत्येकाला आपल्या सदसदविवेकबुद्धीनुसार निर्णय घेण्याचं स्वातंत्र होतं.

कधीकधी वाटतं आजच्या प्रमाणे त्या काळची माध्यमे असती तर शेतकरी कामगार पक्षाच्या घरात कॉंग्रेसी विचारसरणीचे शरद पवार साहेब म्हणून पवार घराण्यात अंतर्गत कलह म्हणून त्यावेळी बातम्या छापल्या असत्या. पण व्यक्तींच्या निर्णय स्वातंत्र्याचा आदर राखत तेव्हा माध्यमांनी आपली भूमिका पार पाडली.

साहेबांच्या वाढदिवसादिवशी मुद्दामहून मी या गोष्टी मांडत आहे कारण पवार कुटूंब आणि महाराष्ट्र हे नातं इतकं दृढ होण्यामागे मला दोन गोष्टी खूप महत्वाच्या वाटतात.

एक म्हणजे आपला मुलगा आपल्याच पक्षाच्या, विचारसरणीपेक्षा वेगळी वाट स्वीकारत असून त्याला विरोध न करता त्याच्या विचारांचा सन्मान करणाऱ्या शारदाबाई मला खूप महान वाटतात तर त्याच सोबत आपल्याला पारंपारिक, तुलनेत सोप्पा असणारा मार्ग न स्वीकारता स्वकर्तृत्वाने काहीतरी करून दाखवणारे साहेब मला मोठ्ठे वाटतात. यातूनच साहेब घडत गेले. म्हणून आपल्या आत्मचरित्रात देखील साहेब मोठ्या सन्मानाने शारदाबाईंचा उल्लेख करतात.

माझा जन्म पवार कुटुंबातला पवार साहेब हे माझे आजोबा. एक गोष्ट मनापासून सांगतो, आयुष्यभर फक्त पवार कुटुंबातला एक सदस्य इतकीच ओळख आपली राहिली तरी चालेल अस सुरवातीच्या काळात वाटत असायचं. पण पवार साहेब हेच अद्भूत रसायन आहेत. कारण घरातील कोणत्याच मुलाची त्यांनी ”पवार साहेबांचा हा आणि पवार साहेबांचा तो” अशी ओळख होवून दिली नाही. प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रात काहीतरी करण्याच बळ दिलं. अगदी आजही कुटूंबातला एखादा शाळेत जाणाऱ्या मुलाला ते जवळ घेतात आणि प्रश्न विचारतात. पुढे काय करणार? आत्ता काय करतो? कोणती गोष्टीत रस आहे हे ते समजून घेतात.

तुम्ही म्हणाल साहेबांच्या वाढदिवसादिवशी मी तुम्हाला कुटूंबातील गोष्टी का सांगतोय. तर याचं महत्वाच कारण म्हणजे एक कुटंबप्रमुख असणारा व्यक्ती स्वत: कसा घडतो आणि दूसऱ्यांना कसं घडवतो हे मला सांगायचं आहे. आणि हे तुम्हाला मुद्दाम सांगू वाटतं कारण आजचं राजकारण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात कुटूंबप्रमुख म्हणून कोणती व्यक्ती असेल तर ते आदरणीय साहेब आहेत.

गोष्टी अगदी साध्या आणि सोप्या असतात. म्हणजे पवार साहेब कधीच कुणाला कळले नाहीत. ते कोणत्या क्षणी कोणता निर्णय घेतील हे सांगता येत नाही ते नेहमीच भविष्याचा विचार करून गोष्टी करतात हे सर्व खरं असलं तरी पवार साहेब हे नेमके कसे आहेत हे मला कोणी विचारलं तर मी म्हणेल जसे तुमचे वडील आणि आजोबा आहेत तसेच पवार साहेब आहेत. घरावर कितीही संकटे कोसळली तरी कुटूंबासाठी उभा राहणारे व्यक्ती असतात तसेच पवार साहेब आहेत. आपले आजोबा, वडिल बाहेर कितीही कष्ट पडोत पण घरातल्यांना त्याची पुसटशी कल्पना देखील होवू न देता सर्व काही संभाळून नेत असतात तसेच साहेब आहेत. मी साहेबांच राजकारण पाहतो तेव्हा प्रकर्षाने मला या गोष्टी जाणवत राहतात.

घरचा प्रमुख व्यक्ती बाहेरच्या व्यक्तींबरोबर मैत्री करताना देखील तशीच करतो. साहेबांचे देखील असंख्य मित्र. आदरणीय खा. श्रीनिवास पाटलांसोबत असणारी त्यांची मैत्री तर आपणा सर्वांना माहितच आहे. आजच राजकारण तर आपण पहातच आहात पण श्री. विठ्ठल मणियार यांच्यासारखे साहेबांचे असंख्य मित्र. त्यांची एक आठवण मला सांगू वाटते. जेव्हा किल्लारीमध्ये भूकंप झाला तेव्हा पाऊस पडत असल्याने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करणं अत्यावश्यक होतं. अशा वेळी बांबूंची आवश्यकता होती. त्यासाठी श्री. विठ्ठल मणियार तात्काळ धावून आले. इथे मैत्री तर जिंकतेच सोबत आपला मित्र काहीतरी चांगल करू पाहत आहे तर त्याच्यासाठी धावून जाणारी उर्जा देखील काहीतरी औरच असते. कुण्या एका व्यक्तींच नाव घेणं ही खरच अवघड गोष्ट आहे इतके असंख्य मित्र साहेबांचे आहेत. ते ही दोस्ती राजकारणात असून देखील, महत्वाच्या पदांवर काम करत असताना देखील संभाळतात याच कौतुक वाटतं.

असाच एक किस्सा म्हणजे आदरणीय बाळासाहेबांचा. महाविकास आघाडी मार्फत जेव्हा मुख्यमंत्री म्हणून श्री. उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली तेव्हा साहेब म्हणाले आम्ही एकमेकांवर जहरी टिका करायचो. वाद व्हायचे. मी देखील बाळासाहेबांवर टिका करायचो पण सभा संपली की मातोश्रीवर जायचो तेव्हा मिनाताई जेवण करून वाढत असत. बाळासाहेब आणि आदरणीय साहेब यांच्यात निखळ मैत्री होती. ही मैत्री जपण्यात दोघांचाही वाटा खूप मोठ्ठा होता. मला वाटतं महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे काय हे आदरणीय साहेबांनी आणि बाळासाहेबांनी आम्हा तरूणांना शिकलचं पण राजकारण म्हणजे सुडाच राजकारण नसतं, इथे माणसे तोडायची नसतात तर ती जोडायची असतात हे देखील त्यांनीच शिकवलं.

साहेबांच्या अशा अनेक गोष्टी आहेत. आपणा सर्वांना त्या माहित देखील आहेत. तरिही त्या पुन्हा सांगू वाटतात कारण कसं असावं हे कुटूंबप्रमुखच शिकवत असतात. आपण त्यांच्याकडून शिकलं पाहीजे. राजकारणात कोणते निर्णय कधी घ्यावेत इथपासून ते घर कस चालवावं ते मैत्री कशी करावी इथपर्यन्त. म्हणूनच साहेब मला आवडतात. आपल्याला आवडणाऱ्या खूप गोष्टी असतात पण त्यात साहेबांसारखी लोकं खूप महत्वाची असतात.

साहेबांचा नातू म्हणून नाही तर उद्याचा महाराष्ट्र कसा असावा हे पाहणारा एक तरुण म्हणून मला आवर्जून सांगू वाटतं, साहेबांनी काल जसा महाराष्ट्र उभा केला तसाच महाराष्ट्र उद्या देखील असावा. एकमेकांचा द्वेष करणारा नाही तर हातात हात घालून लढणारा लढवय्या महाराष्ट्र आणि अशा गोष्टी एका कुटूंबप्रमुखालाच समजू शकतात.

आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

Web Title: NCP MLA Rohit Pawar birthday wish to Sharad Pawa

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com