राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी वाढीव जागा मंजूर

राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी वाढीव जागा मंजूर

मुंबई : अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूरमधील ऑनलाइन प्रवेशाकरिता निश्‍चित केलेल्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयांत जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांचा भाग दोन भरून घेणे व पुढील प्रक्रिया उद्या 19 जूनपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. 

शेलार म्हणाले, मुंबईकरिता निश्‍चित ऑनलाइन प्रवेश क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेकरिता 5 टक्के आणि कला व वाणिज्य शाखेकरिता 8 टक्के अधिक जागा वाढवून देण्यात येत आहे. तसेच पुणे व नागपूरकरिता निश्‍चित करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश क्षेत्रामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेकरिता 10 टक्के जागा विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वाढवून देण्यात येत आहेत. ही वाढ या क्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेशाकरिता नोंदणी केलेले राज्यमंडळ आणि सीबीएसई (CBSE) व आयसीएसईच्या (ICSE) विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन करण्यात येत आहे.

तसेच विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाव्यतिरिक्त अन्य कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही जागा वाढवून देण्यास मंजुरी देण्यात येत आहे. या महाविद्यालयांच्या मागणीनुसार व त्यांची गरज तपासून वाढीव जागा विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर मंजूर करण्यात येतील. 

जुलै 2019 मध्ये पुरवणी परीक्षा व यानंतर इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सदर वाढीव जागेची टप्प्याटप्प्याने तरतूद करण्यात येईल. सन 2019-20 या वर्षाकरिताच इयत्ता अकरावी करिता कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये या वाढीव जागा मंजूर करण्यात येत आहेत. 

Web Title: For 11th Admission seats have been Increased in Maharashtra

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com