अजित पवारांचं हे मोठं विधान...

अजित पवारांचं हे मोठं विधान...

मुंबई : भारतीय जनता पक्ष (भाजप) व राष्ट्रवादी काँग्रेसचे अगोदरच ठरले होते. राष्ट्रवादीने काही महिन्यांपूर्वीच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या. मात्र, पक्षाचे मोठे नेते आता मला खोटे पाडत आहेत, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी कार्यकर्त्यांकडे केला.

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याबाबत काही गौप्यस्फोट केले आहेत. अजित पवार यांनी बारामतीच्या कार्यकर्त्यांसमोर आपण भाजपला का पाठिंबा दिला याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांना भेटायला गेलेल्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, भाजप आणि राष्ट्रवादीचे अगोदरच ठरले होते. त्यासंदर्भात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकाही झाल्या होत्या. पण, मला आता शब्द फिरवायला सांगितला जातोय, असे अजित पवार यांनी आम्हाला सांगितले.

महाविकास आघाडीत अडीच वर्षे शिवसेनेचा तर अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असा निर्णय झाला होता, मात्र शेवटच्या बैठकीत शब्द फिरवण्यात आला, ज्यामध्ये पाच वर्ष पूर्ण सेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच-अडीच वर्षांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार असे ठरले. गुप्त मतदार झाले तर आपण जिंकणार, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. मला आमच्या नेत्यांकडून गप्प बसायला सांगितले जात आहे, पण वेळ आल्यावर सर्व बोलणार. केंद्रात भाजपचे भक्कम सरकार आहे, त्यांच्याकडून आपल्याला निधी मिळणार म्हणून सेनेपेक्षा भाजपसोबत जाणे योग्य असणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली. देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाजूने आणि विरोधात असे जवळपास दीडतास युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय मंगळवारी (ता. 26) 10.30 पर्यंत राखीव ठेवला आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: ajit pawar talks about why he supported bjp maharashtra government formation

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com