बावधन येथे हॉटेलच्या नावाखाली अनधिकृत हुक्का पार्लर राजरोसपणे सुरू 

बावधन येथे हॉटेलच्या नावाखाली अनधिकृत हुक्का पार्लर राजरोसपणे सुरू 

बावधन - शहरात हुक्का पार्लरला बंदी असतानादेखील भूगाव, भुकूम परिसरात हॉटेलच्या नावाखाली अनधिकृत हुक्का पार्लर राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणाई यामध्ये अडकत आहे.

चांदणी चौकातून पौडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भूगाव आणि भुकूम या गावात मानस बंधाऱ्याच्या किनारी, पौड रस्त्यावर हुक्का पार्लरची अनधिकृत हॉटेल सर्रास सुरू आहेत. पौड रस्त्यावरचे एक हॉटेल तर चक्क पॉलिहाउससाठी बांधलेल्या एका शेडमध्येच चालू आहे. पोलिसांचा वरदहस्त असल्याने हे हॉटेल सुरू असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. पुण्यातील अल्पवयीनसह युवक युवतींचा रात्रभर या भागात धुडगूस चालू असतो. युवा मंडळी हुक्‍क्‍याचा झुरका घेण्यासाठी रात्रीतून हजारो रुपये खर्च करीत असतात. तरुणाईकडून अश्‍लील प्रकारही रात्रभर चालू असतात. हुक्का ओढल्यानंतर झिंगलेल्या तरुणांना भान राहत नाही. बेभान होऊन गाड्या चालविल्याने रात्रीच्या वेळीही काही अपघात घडलेले आहेत. गावाजवळच अशी अनधिकृत हॉटेल असल्यामुळे ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागत आहे. 

रात्रीच्या वेळी हुक्का पार्लरची सर्व हॉटेल दररोज भरलेली असतात. विशेष म्हणजे रात्री अकरानंतर या ठिकाणी गर्दीला सुरवात होते.  पोलिसांनी व्यसनाधीन होऊ लागलेल्या तरुणाईला लगाम घालावा, अशी मागणी भूगाव, भुकूम भागातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Hukka Parlour Pune City Youth Addiction Crime

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com