बर्थ-डे बाॅयसह मित्रांना पोलिस कोठडीची सफर

बर्थ-डे बाॅयसह मित्रांना पोलिस कोठडीची सफर

तळेगाव स्टेशन - सार्वजनिक ठिकाणी वाढत्या स्वैराचाराला आळा घालण्यासाठी, तळेगाव दाभाडे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे भररस्त्यावर मध्यरात्री वाढदिवस साजरा करणे बर्थडे बाॅयसह त्याच्या सहा मित्रांना भलतेच महागात पडले. बर्थ-डे गिफ्ट म्हणून अनपेक्षितपणे या टवाळखोरांना चक्क पोलिस कोठडीची सफर अनुभवायला मिळाली.


शनिवारी मध्यरात्री पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील यांना एका व्यक्तीने इंद्रायणी काॅलनीतील भररस्त्यावर काही टवाळखोर युवक केक कापून वाढदिवस साजरा करत बेभान होऊन दंगा-मस्ती करत एकमेकांवर अंडी फेकत असल्याची माहिती दिली. कार्यतत्पर निरीक्षक पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता बीट मार्शल टीमला ही माहिती दिली.रात्रगस्तीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनवणे आणि सहकाऱ्यांनी थोडयाच वेळात इंद्रायणी काॅलनी गाठली. परंतु तोपर्यंत सेलिब्रेशन संपले होते. एका मोबाईल स्टोरसमोर रस्त्यावर पोलिसांना केकची मोकळी खोकी आणि पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या.याबरोबरच रस्त्यावर पांढऱ्या रंगात बर्थडे बाॅयचे नावही टाकलेले दिसले. सर्व धागेदोरे घेऊन रात्रगस्तीवरची  टीम निघून गेली.दुसऱ्या दिवशी सकाळीच पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी जाऊन धाग्यादोऱ्यांवरून संबंधित युवकांचा शोध घेत त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन आले. एका तिऱ्हाईत मध्यस्थाच्या विनंतीवरुन वाढदिवसाच्या दिवसाची मुभा पोलिसांनी दिली मात्र, सोमवारी सकाळीच हजर होण्याच्या अटीवर सोमवारी सकाळी पोलिसांनी बर्थडे बाॅयसह त्याच्या सहा मित्रांची रवानगी पोलीसांनी थेट कोठडीत केली. सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून तुमच्यावर कलमे लावून कायदेशीर कारवाई का करु नये? असा प्रश्न विचारताच यामुळे पुढचे शैक्षणिक करिअर बरबाद होणार या धास्तीने, सर्वांचीच पाचावर धारण बसली.

पोलिस निरीक्षकांनी सज्जड दम भरत त्यांच्याच फोनवरुन सर्वांच्या पालकांना बोलावून घेत,प्रश्नांची सरबत्ती केली. मध्यरात्रीपर्यंत आपली मुले घराबाहेर काय करतात? याचे भान प्रत्यकाने ठेवायला हवे. आपणही एक नागरिक आहोत या जाणिवेतून इतरांना त्रास होणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यायलाच हवी. शेवटी नाना विनंत्या आणि माफीनाम्यावर प्रकरण निभावले असले तरी, सार्वजनिक ठिकाणी बर्थ डे सेलिब्रशनची हौस चांगलीच जिरल्याचे, हावभाव त्या बर्थडे बाॅयसह मित्रांच्या चेहऱ्यावर होते.तळेगाव शहर परिसरात सार्वजनिक ठिकाणी वाढदिवसाचा केक तलवारीने कापणे, त्यानंतर मद्यपान अथवा नाचगाणे आणि दंगा मस्ती करण्याबरोबरच फ्लेक्सबाजी तसेच सोशल मीडियाद्वारे भाईगिरी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असलयाचे सदर कारवाईवरुन समोर आले.वाढदिवसाच्या निमित्ताने भाई, दादा, नाना वा तत्सम उपाध्या लावून फ्लेक्स झळकवणाऱ्यांना तसेच सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशन करणाऱ्यांना यापुढे कडक पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार असलयाचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तळेगाव दाभाडेचे पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी सांगितले, "अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे सार्वजनिक ठिकाणी स्वैराचार करणे नव्हे. सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशन करुन शांततेला बाधा आणने हा कायद्याने गुन्हा आहे.सार्वजनिक ठिकाणी असले प्रकार होत असल्यास नागरिकांनी निर्धास्तपणे पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावेत.पुढचे सेलिब्रेशन पोलिसांतर्फे करण्यात येईल." 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com