हल्लेखोरांनी दुचाकीवरील दोघांवर भर रस्त्यात कोयता आणि गजाने केला हल्ला 

हल्लेखोरांनी दुचाकीवरील दोघांवर भर रस्त्यात कोयता आणि गजाने केला हल्ला 

चाकण ः चाकण-तळेगाव राज्य मार्गावर चाकणजवळील खराबवाडी (ता. खेड) गावाच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरील दोघांवर भर रस्त्यात कोयता, गजाने हल्लेखोरांनी हल्ला केला. यात प्रशांत धर्मनाथ बिरदवडे (वय 19, रा. चाकणचा राणूबाईमळा) याचा खून करण्यात आला.

पीयूष शंकर धाडगे (वय 19, रा. चाकणचा धाडगेमळा) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी आज दिली. 

प्रशांत व त्याचा मित्र पीयूष हे दोघे दुचाकीवर होते. खराबवाडी गावाजवळील चौधरी ढाब्याजवळ हल्लेखोरांनी त्यांना बोलावून त्यांच्यावर कोयता, लोखंडी गजाने हल्ला चढवला. यात प्रशांत याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर प्रशांत याचा मृतदेह अर्धा तास जागीच पडून होता. काही स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी रुग्णवाहिका व पोलिस आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. प्रशांत याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला त्या वेळी नातेवाइकांनी; तसेच इतरांनी मोठी गर्दी केली होती.

प्रशांत व पीयूष यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते. प्रशांत व पीयूष याला येरवडा येथे तुरुंगवासही झाला होता. नुकतीच त्यांची जामिनावर सुटका झाली होती. हल्लेखोर सात जण होते. हल्लेखोरांनी पीयूष याला फोनवर संपर्क साधून बोलावून घेतले होते. आरोपी चाकण येथील असून, त्यांची नावे निष्पन्न होत आहेत, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगितले. 
 

Web Title: Young boy murder Across the road in chakan

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com