धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर?

धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर?

लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या नेत्यांनी सहकार्य न केल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक हेही भाजपत जाण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. यासंदर्भातील महाडिक यांच्या हालचालीही वाढल्या असून, भाजपची मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्याचा शब्द देण्यात आल्याचे सांगण्यात येते. महाडिक यांनी भाजपत प्रवेश केला, तर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असेल. 

लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी घेण्याचा दबाव महाडिक यांच्यावर कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांकडून होता. तथापि, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरील निष्ठा व प्रेमापोटी त्यांनी राष्ट्रवादीतूनच लढण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्ष निवडणुकीत धोका होणार असल्याचे त्यांना माहिती होते आणि झालेही तसेच. त्यामुळे महाडिक हे नाराज आहेत. त्यातून पर्यायांचा शोध त्यांनी सुरू केला होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच त्यांनी याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकरवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीतच त्यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला होता, तथापि जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे हा निर्णय लांबल्याचे सांगितले जाते. 

राज्यातील राष्ट्रवादीच्या अनेक आजी, माजी आमदार, खासदारांनी भाजप किंवा शिवसेनेची वाट धरली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो, या भागातील साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेकांनी भाजपत प्रवेश केला आहे. आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे हेच भाजपत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या झळकू लागल्या आहेत. आता कोल्हापुरातील महाडिक हेही येत्या सोमवारी किंवा पुढील आठवड्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा करण्याची शक्‍यता आहे.

Dhananjay Mahadik on the way to BJP

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com