मी ज्यातून गेलो ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये- एकनाथ खडसे

मी ज्यातून गेलो ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये- एकनाथ खडसे

मुंबई : विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी शेवटी ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भावनांना वाट करून दिली. गेल्या चाळीस वर्षांत मी एकही निवडणूक हरलो नाही, असा प्रारंभ करीत या पाच वर्षांच्या काळात माझ्यावर अत्यंत वाईट आरोप झाल्याची खंत खडसे यांनी व्यक्‍त केली. मी भ्रष्ट, चोर आहे काय, असे प्रश्‍न करीत ते म्हणाले, "हा नाथाभाऊ असल्या आरोपांचे डाग घेऊन जगू इच्छित नाही. खरेतर गेल्या तीन वर्षांत मीदेखील अनेक फाईल जमा केल्या आहेत. नाथाभाऊ तुम्ही ही प्रकरणे बाहेर का काढत नाही? असे काहींनी मला म्हणून पाहिलेही. पण, मी ज्यातून गेलो ते अनुभव कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत म्हणून मी शांत आहे.'' 

नाथाभाऊंचे हे कथन सभागृह सुन्न होऊन ऐकत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी सभागृहात हजर होते. नाथाभाऊ अधिवेशनातल्या अखेरच्या दिवसाचे भाषण करीत आहेत की गर्भित धमकी देत आहेत, याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यास मंत्रिवर्गाने प्रारंभ केला असतानाच खडसे यांनी त्यांच्या कथनास प्रारंभ केला. 

त्यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ही सल अजूनही खडसेंच्या मनात आहे. वारंवार त्यांनी ही सल बोलूनही दाखवली. आजही ही सल बोलून दाखवताना खडसे भावनिक झाले होते. तसंच आपल्यावरील आरोपांचे स्पष्टीकरण देताना खडसेंनी आपल्याच सरकारला शालजोडे लगावले. 288 आमदारांपैकी सर्वांत भ्रष्ट आणि नालायक आमदार म्हणून मी आज इथे उभा असल्याचे खडसे उद्वेगाने म्हणाले. सभागृहातील विरोधक आणि सत्ताधारी आमदारांपैकी कोणीही माझ्यावर आरोप केले नाहीत. बाहेरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केले. दाऊदच्या बायकोशी माझे बोलण्याची संबंध जोडले गेले. दाऊदला सोडून तिला नाथाभाऊंशी का बोलावं वाटलं, हे मला कळलंच नाही. एटीएस आणि इतर यंत्रणांनी केलेल्या चौकशीत काहीच सिद्ध झालं नाही, त्यामुळे मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही बरं वाटलं, असं उपरोधकपणे खडसे म्हणाले. 

"दाऊद इब्राहिमची पत्नी मला फोन करते. तिचे फोन आले, असे आरोप झाले. प्रत्यक्षात जे क्रमांक होते ते माझ्यापेक्षाही बड्या मंडळींचे होते. मनीष भंगाळे नावाच्या हॅकरने माझ्यावर आरोप केले. जमीन खरेदीचा आरोप झाला, प्रत्यक्षात मी एमआयडीसीत जमीन खरेदीच केलेली नाही,'' असेही ते म्हणाले. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी मोठ्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी नाथाभाऊ आपल्याला छोट्या दिव्यातून जावे लागत असल्याचे विधान करीत त्यांच्या भावनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. 

Web Title:  Emotions expressed by Eknath Khadsen

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com