मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने साईचरणी टेकला माथा!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने साईचरणी टेकला माथा!

शिर्डी : 'सचिन, सचिन' अशा जल्लोषात हात उंचावत चाहत्यांनी केलेले जोरदार स्वागत स्वीकारत, सोमवारी (ता.13) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कुटुंबीयांसमवेत येथे येऊन साईसमाधीवर माथा टेकला.

'शिर्डी माझे पंढरपूर' ही बाबांची छोटी आरतीदेखील केली. मंदिरातून बाहेर पडताना रस्त्याने दुतर्फा जमलेल्या चाहत्यांचे अभिवादन आनंदाने स्वीकारत तो पुन्हा विमानतळाकडे रवाना झाला.

दुपारी अडीचच्या सुमारास त्याचे चार्टर प्लेनने शिर्डी विमानतळावर आगमन झाले. साईमंदिर परिसरात त्याच्या स्वागतासाठी विविध प्रांतांतून आलेले भाविक व चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे त्याच्या मंदिरात जाण्याच्या मार्गावर दुतर्फा अडथळे उभारले होते. पावणेतीनच्या सुमारास आलिशान मोटारीतून तो मंदिर परिसरात आला. पत्नी अंजली, मुलगा अर्जुन, मोठा भाऊ अजित यांच्यासह दहा सदस्य त्याच्या समवेत होते.

निर्मनुष्य केलेल्या मार्गावरून सुरक्षारक्षकांच्या गराड्यात हे सर्व जण साईमंदिरात गेले. तेथेही रांगेत उभ्या असलेल्या भाविकांनी त्यांचे स्वागत केले. चाहत्यांना अभिवादन करीतच पुढे जाऊन त्याने साई समाधीचे दर्शन घेतले. साई संस्थानचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तेथे गर्दी केल्याने त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांना समाधीपासून दूर उभे राहण्याची वेळ आली.

साईदर्शनानंतर संस्थानचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी सचिनचा साईबाबांची संगमरवरी मूर्ती देऊन सत्कार केला.

व्हिजिंटिंग बुकला फाटा देऊन फोटोसेशन!

महत्वाच्या व्यक्ती साईदर्शनासाठी आल्या की साई संस्थानातर्फे त्यांचे स्वागत केले जाते. साईदर्शनानंतर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी त्यांच्यासमोर व्हिजिटिंग बुक ठेवण्यात येते. त्यात ते आपल्या भावना नोंदवितात. ही नोंदवही सांभाळून ठेवली जाते.

या प्रथेला अलीकडे फाटा देण्यात आला. त्याऐवजी दर्शनासाठी आलेल्या सेलिब्रिटींसमवेत सपत्नीक फोटोसेशन करण्यात संस्थानचे वरिष्ठ अधिकारी धन्यता मानतात. सोमवारी पुन्हा त्याची प्रचिती आली.

Web Title former indian cricketer sachin tendulkar seeks blessings shirdi sai baba family

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com