आमचीही सर्वच जागांवर लढण्याची तयारी, उमेदवारांची यादी देखील तयार - गिरीश महाजन

आमचीही सर्वच जागांवर लढण्याची तयारी, उमेदवारांची यादी देखील तयार - गिरीश महाजन

नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती झाली नाही तरी 288 जागा लढविण्यासाठी उमेदवारांची यादी तयार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावला आहे. आमचीही सर्वच जागांवर लढण्याची तयारी आहे. उमेदवारांची यादी देखील तयार आहे, असे सांगत त्यांनी शिवसेनेला डिवचले.

मंत्री महाजन यांनी कॉंग्रेस आघाडीला चिमटा घेतला ते म्हणाले की, भाजप - शिवसेना युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेसने आघाडी जाहीर केली असली, तरी त्यांना उमेदवार मिळणे मुश्‍कील आहे. त्यामुळे लवकर कामाला लागल्याबद्दल 'त्यांना शुभेच्छा' या शब्दात त्यांनी आघाडीची खिल्ली उडविली.

महाजनादेश यात्रेचा समारोप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाजन नाशिकमध्ये आले. त्या वेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, "19 सप्टेंबरचा कार्यक्रम भाजपचाच आहे. त्यामुळे या सभेसाठी उध्दव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. शिवसेनेकडूनही राज्यात रॅली, सभा सुरू आहे त्यांच्या पक्षाचा तो कार्यक्रम असल्याने कोणाला कार्यक्रमांना बोलवावे हा त्या-त्या पक्षांचा प्रश्‍न आहे.'' सभेच्या निमित्ताने मेगाभरतीचा तिसरा पार्ट होणार का, या मिश्‍कीलपणे उत्तर देताना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे मोठे कोणी राहिले नाही. राज्यात जे मोठे होते ते सातारा व कोल्हापूरचे दोन्ही राजे भाजपमध्ये आल्याचे ते म्हणाले. भाजप व शिवसेनेची ताकद मोठी असल्याने युतीबाबत निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचे ते म्हणाले.

'भाजपमध्ये आतापर्यंत ज्यांना प्रवेश देण्यात आला त्यांची त्या-त्या भागात ताकद आहे. स्वतःसह आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य निवडून आणण्याची त्यांची क्षमता असल्याने त्यांना पक्षात घेतले जात आहे. याचा अर्थ निष्ठावंतांना डावलले जाते, असा होत नसल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही भाजपमध्ये जात असलो तरी अंतःकरणात तुम्हीच असल्याचे प्रवेशकर्ते सांगत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी नाशिकमध्ये केले होते. तो धागा पकडत पालकमंत्र्यांनी पवार यांना त्यांना अंतःकरणातच ठेवण्याचा उपरोधिक सल्ला दिला.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com