कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील खासगी अभिषेक बंद

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील खासगी अभिषेक बंद

कोल्हापूर - करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील खासगी अभिषेक बंद करण्याचा निर्णय पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने आज घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून (ता. १२) होणार असून, ज्यांना देवीला अभिषेक करावयाचे आहेत त्यांनी देवस्थान समितीशी संपर्क करावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे.

अंबाबाई मंदिरात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. ज्यांची कुलदेवता अंबाबाई आहे, अशा स्थानिक आणि परगावच्या भाविकांकडून वर्षातून किमान एकदा देवीला अभिषेक घातला जातो. यासाठी भाविक सहकुटुंब मंदिरात येतात. गाभाऱ्यातील अभिषेक बंद झाल्यानंतर हे अभिषेक गरुड मंडपात केले जाऊ लागले. श्रीपूजकांव्यतिरिक्त काही खासगी पुरोहित हे अभिषेक करतात. देवस्थान समितीचे पुरोहितदेखील सकाळी साडेसहा, साडेआठ आणि साडेअकरा वाजता अभिषेक करतात. 

खासगी पुरोहित अभिषेकाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट करतात, अशा तक्रारी देवस्थान समितीला प्राप्त झाल्या. त्यामुळे देवस्थान समितीने मंदिराच्या आवारात खासगी पुरोहितांना अभिषेक करण्यास मज्जाव केला आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

खासगी पुरोहितांबाबत तक्रारी आल्याने देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. समितीचे पुजारी नियमितपणे भाविकांचे अभिषेक करतात. ज्या भाविकांना अभिषेक करावयाचे आहेत, त्यांनी मंदिरातील समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांना पुरोहित आणि अभिषेकाचे सर्व साहित्य समितीकडून उपलब्ध करून दिले जाईल. 
- विजय पोवार,
 सचिव, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

Web Title: Ambabai temple private abhishekha issue

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com