पंचगंगा नदीला पुर; कोल्हापूर - रत्नागिरी राज्य मार्गावरील वाहतूक बंद

पंचगंगा नदीला पुर; कोल्हापूर - रत्नागिरी राज्य मार्गावरील वाहतूक बंद

कोल्हापूर - राधानगरी धरण (लक्ष्मी तलाव) संचय क्षमतेने पूर्ण भरले. धरणातील क्षमतेपेक्षा अधिक पाणी विसर्ग करणाऱ्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी चार दरवाजे बुधवारी खुले झाले. त्यातून प्रतिसेकंद ४२०० क्‍युसेक, तर पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीसाठी सोडलेले १४०० असा ५६०० क्‍युसेक पाण्याचा धरणातून भोगावती नदीत विसर्ग सुरू आहे. भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 

ड्रोनच्या माध्यमातून पाहा पंचगंगेचं विस्तीर्ण रूप.
दरम्यान, शहरात सकाळी तासभर झालेल्या सूर्यदर्शनानंतर दिवसभर शहर परिसरात पावसाची रिपरिम कायम राहिली. सायंकाळी सहाच्या सुमारास केर्ले येथे मुख्य रस्त्यावर पाणी आल्यामुळे कोल्हापूर - रत्नागिरी राज्य मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. रात्री आठच्या सुमारास आंबेवाडीजवळील रेडे डोह  जवळ पाणी आल्‍याने सीपीआरपासूनच पुढे जाण्याचा मार्ग बॅरिकेडस लावून बंद केला. 

पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्री आठ वाजता ४० फूट ८ इंचापर्यंत पोचली होती. इशारा पातळी ओलांडून आता धोक्‍याच्या पातळीकडे (४३ फूट) पाणी जात आहे. पंचगंगा नदीपात्रातील पाणी सायंकाळी सात वाजता गायकवाड वाड्याच्या पुढे होते. जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे एसटी महामंडळाने १२ ठिकाणच्या मार्गावरील एस.टी. वाहतूक बंद केली आहे, तर काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवली आहे.

आंबेवाडीजवळील रेडे डोह फुटल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्यामुळे अनेकांनी पाणी पाहण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, तेथे अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे दिसून आले. रात्री आठच्या सुमारास रेडे डोह फुटण्याची शक्‍यता असल्यामुळे सीपीआर परिसरातील चिमासाहेब चौकातच बॅरिकेडस्‌ लावून शिवाजी पुलावरून जाणारी वाहतूक बंद केली. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांनी वाहतूक बंद करण्याचे जिल्हा प्रशासनाला कळविल्यामुळे हा मार्ग बंद केल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.

तुळशी ७६, दूधगंगा (काळम्मावाडी) ६१.९४ टक्के भरले आहे. राजाराम  बंधाऱ्याजवळील इशारा पाणी पातळी (३९ फूट) पहाटे २.२० वाजता इतकी राहिली. सायंकाळी ती ४० फूट सहा इंचांपर्यंत पोचली आहे. गगनबावडामार्गे बंद असलेली वाहतूक आज सकाळी पुन्हा सुरू केली होती. मात्र, तेथे पुन्हा भूस्खलन होण्याची शक्‍यता असल्यामुळे रात्री ही वाहतूक बंद केल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.

एस.टी. महामंडळाकडून बंद असलेले जिल्ह्यातील मार्ग असे

 गगनबावडा ः मांडकुली, लोंघे, कासे फाटा, किरवे मंदिर 
 संभाजीनगर ः भोगाव पडसाळी, आरळे, पोहाळे, महे, बीड 
 कुरुंदवाड ः इचलकरंजी, कुरुंदवाड, शिरोळ
 गडहिंग्लज ः कोवाड, नांगनूर, ऐनापूर बंधारा व निलजी
 आजरा ः साळगाव, देव कांडगाव, किटवडे, साळगाव
 गारगोटी ः मोरस्करवाडी, वाळवा, बाचणी मार्गे कोल्हापूर, म्हसवे व बाचणी 
 मलकापूर ः गावडी, सृष्टीवाडी, मालेवाडी  
 चंदगड ः इब्राहिमपूर, भूजवडे, दोडामार्ग, हेरे, गवसे, फार्णेवाडी 
 कागल ः हुपरी - रंकाळा, मुरगूड, बाणगे, पट्टणकोडोली, बस्तवडे 
 राधानगरी ः आमजाई व्हरवडे, शिरगाव

Web Title: Panchaganga River Flood situation in Kolhapur
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com