शिक्षक भरतीची चालू नसल्याने नैराश्याच्या आहारी न जाता 'ती' झाली पीएसआय

शिक्षक भरतीची चालू नसल्याने नैराश्याच्या आहारी न जाता 'ती' झाली पीएसआय

लातूर : डी.एड झाल्यानंतर अभियोग्यता परीक्षा दिली; पण शिक्षक भरतीची प्रक्रिया काही केल्या सुरू झाली नाही म्हणून महाराष्ट्रातील अनेक मुले शिक्षक भरतीची वाट पाहत थांबले तर अनेक मुलांना नैराश्याने गाठले. पण लातूरातील एका विद्यार्थिनीने शिक्षक भरतीची वाट न पाहता आणि नैराश्याच्या चक्रातही न अडकता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) मन लावून तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात तिची पोलिस उपनिरिक्षक (पीएसआय) म्हणून निवड झाली आहे.

हे कौतुकास्पद यश मिळवले आहे लातूरमधील रेणूका गौतम गालफोडे यांनी. आईसारखे आपणही शिक्षिका व्हावे, असे तिला लहानपणापासून वाटत होते. त्यामुळे रेणूकाने डी. एडची परीक्षा दिली. पुढे शिक्षक पात्रता परीक्षा, अभियोग्यता परीक्षा दिली. त्याआधी बी.ए., एम.एचे शिक्षणही पूर्ण केले. इतके करून शिक्षक भरतीची जाहीरात काही प्रसिद्ध झाली नाही. महाराष्ट्रात हजारो तरुणांचे लक्ष शिक्षक भरतीकडे लागले होते. पण यात वेळ न दडवता रेणूकाने आपला रस्ताच बदलला. एमपीएससीची तयारी सुरू केली आणि यश खेचून आणले.

रेणूका ही अत्यंत साध्या, गरीब घरातील मुलगी. तिच्या वडिलांनी स्त्री आधार केंद्र आणि व्यसनमुक्ती केंद्र या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे तर आई संगीता या खासगी शाळेत शिक्षिका आहेत. या दोघांच्या पाठींबा आणि मार्गदर्शनामुळे रेणूकाला बळ मिळाले. त्यामुळेच तिचा दिवस अभ्यासिकेत सुरू व्हायचा आणि तिथेच मावळायचाही. जेवण आणि झोप ऐवढ्या पुरतीच ती घरी जायची. या कष्टामुळे तिला २४व्या वर्षीच पीएसआय पदापर्यंत पोचता आले. त्यामुळे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

तीन वर्षे मोबाईलपासून दूर
'ज्ञानप्रबोधिनी'मध्ये सुरवातीला मी फाऊंडेशन कोर्स लावला होता. त्यामुळे दिशा सापडली. स्पर्धा परीक्षा काय असते, हे कळले. त्यानंतर मात्र मी सेल्फ स्टडीवर दिला. सेल्फ स्टडी, वेगवेगळ्या पदव्या, आई-वडिलांचे प्रोत्साहन यामुळे हे यश मिळाले. गेल्या तीन वर्षांपासून मी या परीक्षेची तयारी करत आहे. या दरम्यान मी मोबाईल, सोशल मिडियापासून पूर्णपणे दूर राहीले. असे म्हटले जाते, सोशल मिडियाची मदत घेतल्याने अभ्यास चांगला होतो. पण मला तसे वाटत नाही. रेडिमेड नोट्‌सपेक्षा स्वयंअध्ययन महत्वाचे आहे. त्यामुळे तयारी अधिक चांगली होते, असे रेणूकाने सांगितले.

Web Title: Renuka Galphode appointed as psi

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com